maharashtra-petrol-diesel-shortage-farmers-queues-vidarbha-marathwada-fuel-crisis : विदर्भ- मराठवाड्यात शेतकऱ्यांची रात्रभर ट्रॅक्टरवर झोप
Mumbai : राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनंतर आता इंधन टंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले असून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगात सुरू असतानाच डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने हजारो शेतकऱ्यांना रात्रभर पेट्रोल पंपांबाहेर ट्रॅक्टरमध्येच जागून काढावी लागत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये “नो स्टॉक” चे फलक झळकत असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे.
वाशिम जिल्ह्यात सलग नवव्या दिवशी पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रात्रीपासूनच ट्रॅक्टर आणि मालवाहू वाहनांसह शेतकरी पंपांबाहेर थांबत आहेत. अनेक ठिकाणी डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकरी आणि वाहनधारकांना रात्रभर जागून आपला नंबर येण्याची वाट पाहावी लागत आहे. दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईचे संकट अकराव्या दिवशीही कायम असून मागणी आणि पुरवठ्यातील मोठ्या तफावतीमुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.
Legislative Election : युवा स्वाभिमानने कसली कंबर, महायुतीकडे जागेची मागणी!
मे महिन्यात पेरणीपूर्व मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे डिझेलची मागणी साधारण २० ते २५ टक्क्यांनी वाढते. मात्र पुरेसा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी दिवस-रात्र रांगा लागल्या असून काही ठिकाणी वाद आणि हाणामारीचे प्रकारही घडत आहेत. तलवारी आणि कोयते बाहेर निघाल्याच्या घटनांमुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात डिझेलच्या तुटवड्याचा मोठा फटका पूर्व हंगामी कापूस लागवडीला बसत आहे. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. मात्र यंदा ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने अनेक शेतजमिनींची मशागत अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. परिणामी मागील वर्षाच्या तुलनेत पूर्व हंगामी कापूस लागवड अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.
Legislative elections : अनिल अग्रवाल यांचे दिल्ली-मुंबईत लॉबिंग; देशमुखांचाही दावा मजबूत
हिंगोली जिल्ह्यातही डिझेल टंचाईमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने “नो स्टॉक” चे फलक लावण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी डिझेल उपलब्ध आहे, त्या ठिकाणी मध्यरात्रीपासूनच वाहनांच्या रांगा लागत आहेत. ट्रॅक्टर, पिकअप, मालवाहू वाहने आणि दुचाकी चालक डिझेलच्या प्रतीक्षेत अनेक तास वाहनांमध्येच बसून राहत असल्याचे चित्र दिसत आहे.
बुलढाणा ते चिखली रस्त्यावरील काही पेट्रोल पंपांवर शेतकरी ट्रॅक्टरसह रात्रभर रांगेत उभे राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री पंप बंद असतानाही सकाळी टँकर येईल आणि डिझेल मिळेल या आशेने शेतकरी जागून राहत आहेत. “झोपायलाही जागा नाही, पण शेतीची कामं करायची असल्याने डिझेल मिळणं गरजेचं आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली.
जालन्यात परिस्थिती आणखी गंभीर झाली असून तब्बल ५९ पेट्रोल पंपांवरील इंधनसाठा संपल्याची माहिती समोर आली आहे. जालना तालुक्यात सर्वाधिक २४ पेट्रोल पंप बंद आहेत. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शेती मशागतीची कामे थांबल्याने खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कळमनुरी तालुक्यातील आराटी येथे डिझेल खरेदीच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. पेट्रोल पंपावरील रांगेतून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून काही शेतकरी जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Uddhav thackeray : बच्चू कडूंला “घरी बोलावून मंत्री केलं, तीच चूक ठरली”
इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा न्यायालय प्रशासनानेही इंधन बचतीसाठी ऑनलाइन सुनावण्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय न्यायालयात येऊ नये, असे आवाहन वकिलांना आणि नागरिकांना करण्यात आले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील इंधन संकटावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना १० ते १५ तास रांगेत थांबूनही डिझेल मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “समस्येचे मूळ पुरवठा साखळीत आहे…








