व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungatiwar : नेत्यावरील प्रेमाची ‘शाश्वत’ पावती, चंद्रपुर जिल्ह्यातील कार्यकर्त्याने हातावर कोरले...

Sudhir Mungatiwar : नेत्यावरील प्रेमाची ‘शाश्वत’ पावती, चंद्रपुर जिल्ह्यातील कार्यकर्त्याने हातावर कोरले ‘सुधीरभाऊ मुनगंटीवार’ नाव

A ‘Permanent’ Proof of Love for a Leader: In Chandrapur, a Party Worker Engraves “Sudhirbhau Mungantiwar” on His Hand : मुनगंटीवारांच्या कार्यशैलीवर यापूर्वी संशोधन करून पीएचडी पदवी प्राप्त

Chandrapur : आजच्या बदलत्या राजकारणात जिथे स्वार्थासाठी पक्ष आणि निष्ठा बदलणे अगदी सहज झाले आहे, तिथे चंद्रपूर जिल्ह्यातून एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावरील दिखावा आणि बॅनर्सच्या महापुरात, एका सामान्य कार्यकर्त्याने आपल्या नेत्यावरील विश्वास चक्क स्वतःच्या हातावर कायमस्वरूपी गोंदवून सिद्ध केला आहे.

गोंडपिपरी येथील प्रतीक अवतरे या तरुणाने तब्बल पाच वर्षांपूर्वी आपल्या हातावर ‘सुधीरभाऊ मुनगंटीवार’ असे नाव कोरले होते, ज्याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आहे. विशेष म्हणजे, कोणतीही राजकीय अपेक्षा न ठेवता, केवळ सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यावरील आदरापोटी त्याने हे पाऊल उचलले असून, गेल्या पाच वर्षांत त्याने याचा कोणताही गाजावाजा केला नव्हता.

Anil Deshmukh : अनिल देशमुख सायकलवर, इंधन दरवाढीचा नोंदवला निषेध

राजकारणात वाढदिवसाची जाहिरातबाजी करणे किंवा सोशल मीडियावर स्टेटस ठेवणे ही आता सामान्य बाब झाली आहे. मात्र, वैयक्तिक जिव्हाळा आणि निष्ठेपोटी स्वतःच्या शरीरावर नेत्याचे नाव कोरणे, ही एक वेगळी आणि मोठी पावती मानली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, हा कोणत्याही राजकीय फायद्यासाठी केलेला स्टंट नसून, सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल असलेल्या अथांग प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्यांची कार्यपद्धती यांमुळेच कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी असा भावनिक जिव्हाळा निर्माण झाला आहे. शिक्षण, आरोग्य, दळणवळण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात त्यांनी चंद्रपूरला नवी ओळख मिळवून दिली. तसेच राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम राज्यासाठी पथदर्शी ठरले असून कष्टकरी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आक्रमक आणि सकारात्मक भूमिका घेतली आहे.

याच कार्यपद्धतीमुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुनगंटीवारांविषयी एक वेगळीच प्रतिमा निर्माण झाली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्याविषयी विविध माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी हातावर बल्लारपूर येथील काशीनाथ सिंह यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार नाव गोंदवले , तर काहींनी त्यांच्या कामावर अभ्यासदेखील केला आहे.

मुनगंटीवार यांच्याविषयीची क्रेझ केवळ टॅटूपूर्ती मर्यादित नाही, तर बाळापूर तळोधी येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक दैवत बोरकर यांनी तर चक्क सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीवर संशोधन करून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या विधिमंडळातील कामकाज, सामाजिक भूमिका, अशासकीय विधेयके आणि संसदीय कौशल्याचा अभ्यास या संशोधनातून करण्यात आला आहे.

Vijay Wadettiwar : पाच लाख ऍडव्हान्स, भाजपने पळवले काँग्रेसचे 23 नगरसेवक, वडेट्टीवारांचा आरोप

चंद्रपूरसारख्या राज्याच्या एका टोकावरील जिल्ह्यातून येऊन राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर स्वतःचा दबदबा निर्माण करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा गारुड आजही जनतेच्या मनावर कायम आहे, हेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हातावर गोंदवलेले ‘सुधीरभाऊ मुनगंटीवार’ हे नाव आता केवळ एक टॅटू राहिले नसून, ते एका कार्यकर्त्याच्या भावनिक नात्याचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. सुधीर मुनगंटीवार हे केवळ एक नाव नसून ती विकास, निष्ठा आणि जनसेवेची एक जिवंत चळवळ बनली आहे, अशीच भावना आता जिल्ह्यात उमटत आहे.

error: Content is protected !!