ncp-devgiri-bungalow-meeting-sunil-tatkare-chhagan-bhujbal-political-clash :‘देवगिरी’ बंगल्यावर राष्ट्रवादीची वादळी बैठक; पक्षातील नाराजी उघड
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवगिरी बंगल्यावर मंगळवारी पार पडलेली बैठक पक्षातील अंतर्गत नाराजी आणि सत्ताकेंद्रांतील बदलत्या समीकरणांमुळे चांगलीच वादळी ठरली. पक्षातील वरिष्ठ नेते सुनील तटकरे यांनी बैठकीत थेट नेतृत्वालाच सवाल करत आपल्या मनातील नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तटकरे यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने बैठकीत काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे दोघेही पक्षात बाजूला पडल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनंतर या दोघांवर सातत्याने राजकीय टीका होत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत तटकरे यांनी प्रथमच उघडपणे आपली भूमिका मांडली.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष संघटना एकसंध ठेवण्याची जबाबदारी आम्ही सांभाळली, पक्षातील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले, तसेच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष उभा करण्यासाठी आम्ही महत्त्वाची भूमिका बजावली, असे तटकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले. मात्र, त्यानंतर आमच्यावर सातत्याने आरोप आणि टीका होत असताना पक्षातील एकही आमदार किंवा वरिष्ठ नेता आमच्या समर्थनासाठी पुढे आला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून केवळ आम्ही दोघेच लक्ष्य का व्हायचे? पक्ष नेतृत्व याबाबत स्पष्ट भूमिका घेणार आहे की नाही, असा थेट सवाल तटकरे यांनी उपस्थित केला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे बैठकीत काही काळ शांतता पसरली होती.
Anil Deshmukh : अनिल देशमुख सायकलवर, इंधन दरवाढीचा नोंदवला निषेध
दरम्यान, परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून छगन भुजबळ यांनी हस्तक्षेप करत “जे घडले ते विसरून आता पुढे जाण्याची गरज आहे” असे सांगत चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तटकरे यांनी भुजबळांचे म्हणणे नाकारत “मी यावर बोलणारच, याबाबत स्पष्टता झाली पाहिजे” अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ शब्दांची चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे.
बैठकीदरम्यान आणखी एक महत्त्वाची घटना घडली. सुनील तटकरे बोलण्यासाठी उभे राहण्याच्या काही क्षणांपूर्वीच पार्थ पवार अचानक बैठकीतून बाहेर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यानंतर तटकरे यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर बैठकीत उपस्थित असलेल्या अनेक आमदारांनी मौन बाळगल्याचे सांगितले जात आहे.
Vijay Wadettiwar : पाच लाख ऍडव्हान्स, भाजपने पळवले काँग्रेसचे 23 नगरसेवक, वडेट्टीवारांचा आरोप
प्रफुल पटेल हे मुंबईत उपस्थित असूनही बैठकीला गैरहजर राहिल्याने पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना आणखी खतपाणी मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व, संघटनात्मक नियंत्रण आणि भविष्यातील राजकीय दिशा यावरून दबक्या आवाजात सुरू असलेला संघर्ष आता उघडपणे समोर येत असल्याचे या बैठकीतून दिसून आले.
देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी अधिक तीव्र झाल्याचे मानले जात असून आगामी काळात पक्षातील समीकरणांमध्ये आणखी मोठे बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
__








