व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sindkhedraja Development : सिंदखेडराजाच्या आकाशात चार्टर विमानाच्या घिरट्या; ‘समृद्धी’ विकास केंद्रांबाबत उत्सुकता

Sindkhedraja Development : सिंदखेडराजाच्या आकाशात चार्टर विमानाच्या घिरट्या; ‘समृद्धी’ विकास केंद्रांबाबत उत्सुकता

New development blueprint along the Samruddhi Expressway; aerial mapping of interchange areas begins : समृद्धी महामार्गालगत विकासाचा नवा आराखडा; इंटरचेंज परिसराचे हवाई मॅपिंग सुरू

Sindkhedraja सिंदखेडराजा शहराच्या आकाशात सोमवारी सकाळी एका चार्टर विमानाने वारंवार घिरट्या घातल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. जवळपास अर्धा तास विमान एकाच परिसरात फेऱ्या मारत असल्याने नेमके काय सुरू आहे, याबाबत शहरभर चर्चा रंगली. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज परिसरात प्रस्तावित विकास केंद्रांच्या अनुषंगाने हवाई सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

सकाळी साडेनऊ ते दहा वाजेदरम्यान हे विमान शहर व परिसराच्या आकाशात वारंवार फिरताना दिसले. सुरुवातीला नागरिकांनी त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही; मात्र सलग फेऱ्यांमुळे उत्सुकता वाढली आणि विविध स्तरांवर चौकशी सुरू झाली. स्थानिक पोलीस, तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयांकडेही नागरिकांनी याबाबत विचारणा केली.

Water crisis : पाणीटंचाईवरून अखेर आमदार अॅक्शन मोडमध्ये; प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

या प्रकाराची पडताळणी केल्यानंतर समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज परिसरात प्रस्तावित विकास केंद्रांच्या दृष्टीने हवाई सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती समोर आली. यापूर्वी समृद्धी महामार्गालगत ‘कृषी समृद्धी नवनगर’ उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र त्या योजनेला स्थगिती मिळाल्यानंतर आता प्रत्येक इंटरचेंजच्या पाच किलोमीटर परिघात विकास केंद्रे उभारण्याचा पर्याय पुढे येत असल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या विकास केंद्रांसाठी राज्य शासनाकडून विशेष विकास प्राधिकरण (एसपीए) स्थापन करण्यात आले असून त्याचे नियंत्रण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) राहणार आहे. प्रस्तावित केंद्रांमध्ये औद्योगिक, व्यावसायिक, सेवा क्षेत्राशी संबंधित सुविधा तसेच विविध पायाभूत प्रकल्पांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अद्याप शासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी येत्या काही आठवड्यांत यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिंदखेडराजा परिसरातील सर्वेक्षणानंतर अमरावती व नागपूर विभागातील समृद्धी महामार्गावरील इतर इंटरचेंज परिसरांतही अशाच प्रकारचे हवाई सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Rahul Bondre : आंदोलनाने सुरुवात, आंदोलनाने निरोप… राहुल बोंद्रे भावुक!

समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित ‘कृषी समृद्धी नवनगर’ संकल्पनेऐवजी आता प्रत्येक इंटरचेंजच्या पाच किलोमीटर परिघात विकास केंद्रे उभारण्याचा आराखडा पुढे येत आहे. या केंद्रांमधून नियोजित पद्धतीने औद्योगिक, व्यापारी व पायाभूत सुविधांचा विकास साधण्यावर भर दिला जाणार आहे.

प्राथमिक माहितीनुसार, इंटरचेंज परिसराचे मॅपिंग, भू-अभ्यास, संभाव्य विकास क्षेत्रांचे सर्वेक्षण आणि विकास केंद्रांसाठी आवश्यक माहिती संकलन या उद्देशाने हवाई पाहणी केली जात असल्याची चर्चा आहे. पुढील काही दिवस सर्वेक्षण सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!