व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Mlc election : ठाण्यापासून चंद्रपूरपर्यंत आठ ठिकाणी बिनविरोध विजय!

Mlc election : ठाण्यापासून चंद्रपूरपर्यंत आठ ठिकाणी बिनविरोध विजय!

 

mahayuti-big-success-in-mlc-election-eight-seats-unopposed-from-thane-to-chandrapur : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे मोठे शक्तिप्रदर्शन; महाविकास आघाडीला मोठा धक्का

Mumbai : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने मोठे राजकीय कौशल्य दाखवत अनेक ठिकाणी बंडखोरी शमवण्यात यश मिळवले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी झालेल्या घडामोडींमुळे महायुतीने अनेक मतदारसंघांमध्ये निवडणूक बिनविरोध करण्याचा मार्ग मोकळा केला असून, हे यश महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानले जात आहे. राज्यातील १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीने ठाणे, कोकण, यवतमाळ, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरसह एकूण आठ ठिकाणी बिनविरोध विजयाची स्थिती निर्माण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

निवडणुकीपूर्वी महायुतीतील अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीचा मार्ग स्वीकारला होता. त्यामुळे अनेक मतदारसंघांत अधिकृत उमेदवारांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे आणि सलग बैठका, चर्चांमुळे बहुतांश बंडखोरांनी माघार घेतली आहे.

धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघात भाजपचे तुळजापूर नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या पत्नी अर्चना गंगणे यांनी दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे महायुतीला मोठा दिलासा मिळाला असून या मतदारसंघात आता भाजपचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे.

Mlc election : सुनेत्रा पवार यांचा शरद पवारांना थेट फोन

नांदेड मतदारसंघातही महायुतीने बंडखोरी रोखण्यात यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. महायुतीकडून भाजपचे अमरनाथ राजूरकर रिंगणात असून त्यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष टळला आहे.

परभणी-हिंगोली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर हा तोडगा निघाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार साजिद बेग यांनी निवडणुकीतून माघार घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर भाजपचे बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांनीही माघार घेतल्याने येथील संघर्ष टळला आहे.

सांगली-सातारा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार तानाजी पाटील यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या भागातील महायुतीतील अंतर्गत मतभेदही निवळल्याचे चित्र आहे.

Sunil kedar : सुनील केदारांना आणखी एक धक्का; नागपूर बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा, विद्यमान संचालक मंडळ होणार बरखास्त!

दरम्यान, नाशिक विधानपरिषद मतदारसंघात मात्र महायुतीची चिंता अद्याप कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील विष्णुपंत म्हैसधुने आणि गोरख बोडके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी गोकूळ गीते हे अजूनही अपक्ष म्हणून मैदानात असल्याने महायुतीची धाकधूक वाढली आहे. भाजपचे गणेश गीते माघारीस तयार झाले असले तरी त्यांच्या भावाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

नागपूर मतदारसंघात काँग्रेसचे डमी उमेदवार दिनेश ढोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसकडून अतुल लोंढे हे अधिकृत उमेदवार राहिले आहेत. त्यामुळे येथे भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट सामना रंगणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीने केलेली प्रभावी समन्वय साधना आणि बंडखोरांची मनधरणी ही या निवडणुकीतील महत्त्वाची राजकीय घडामोड ठरली आहे. अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध करण्यास यश आल्याने महायुतीने आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली असून, यामुळे आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!