vidhan-parishad-election-result-2026-mahayuti-dominates-gokul-gite-shocks-nashik : नाशिकमध्ये गोकुळ गितेंच्या धक्कादायक विजयाने सगळेच चक्रावले
Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील 17 पैकी तब्बल 16 जागांवर महायुतीने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र या एकतर्फी विजयाच्या चित्रात नाशिक मतदारसंघाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नाशिकचा निकाल सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे.
या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान पार पडले. निवडणुकीपूर्वीच ठाणे, यवतमाळ, रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 11 जागांसाठी झालेल्या मतमोजणीनंतर महायुतीने जवळपास संपूर्ण राज्यात विजयाचा झेंडा फडकावला.
भाजपने सर्वाधिक 11 जागांवर विजय मिळवला, तर शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागांवर यश मिळाले. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. त्यामुळे विधान परिषदेत महायुतीची ताकद आणखी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र नाशिकमध्ये चित्र पूर्णपणे वेगळे पाहायला मिळाले. सुरुवातीपासूनच चुरशीची मानली जाणारी ही निवडणूक अखेरीस महायुतीसाठी धक्कादायक ठरली. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पार करत विजय निश्चित केला. एकूण 618 मतदारांपैकी 605 मते वैध ठरली होती. विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. गोकुळ गिते यांनी तब्बल 357 मते मिळवत हा कोटा सहज पार केला. तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना 248 मतांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीतील आणखी एक उमेदवार प्रसाद हिरे यांना एकही मत मिळाले नाही.
निकालापूर्वी मतमोजणी केंद्रावरही मोठा गोंधळ निर्माण झाला होता. गोकुळ गिते यांनी मतमोजणी कक्षात उपस्थित असलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला होता. निवडणूक नियमांनुसार विद्यमान लोकप्रतिनिधींना मतमोजणी प्रतिनिधी म्हणून बसण्यास परवानगी नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावरून दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. अखेरीस निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली.
नाशिकच्या निकालाने महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि छुप्या मतदानाच्या चर्चांनाही बळ मिळाले आहे. जिल्ह्यातील संख्याबळ महायुतीच्या बाजूने असतानाही अधिकृत उमेदवाराचा झालेला पराभव अनेक प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील मतांचे विभाजन तसेच स्थानिक राजकीय समीकरणे यामुळेच हा निकाल लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, राज्यातील इतर मतदारसंघांत महायुतीने अपेक्षेप्रमाणे विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पुढील राजकीय रणनीतींसाठी या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Avinash brahmankar: भाजपचे ब्राह्मणकर विजयी; मात्र महायुतीची मते फुटल्याचीच अधिक चर्चा
विधान परिषद निवडणूक 2026 : विजयी उमेदवारांची यादी
ठाणे – रवींद्र फाटक (शिवसेना) – बिनविरोध यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना) – बिनविरोध रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध पुणे – विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर – अरुण लखाणी (भाजप) – बिनविरोध अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे (भाजप) – बिनविरोध छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट (भाजप) नाशिक – गोकुळ गिते (अपक्ष). भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर (भाजप) सांगली-सातारा – धैर्यशील कदम (भाजप)
परभणी- हिंगोली – सईद खान (शिवसेना)
सोलापूर – राजेंद्र राऊत (भाजप)
धाराशिव-लातूर- बीड – बसवराज पाटील (भाजप)
नागपूर – राजीव पोतदार (भाजप)
जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप)
अमरावती – प्रवीण पोटे (भाजप)
नांदेड – अमर राजूरकर (भाजप)
महायुतीच्या विजयाच्या जल्लोषात नाशिकचा निकाल मात्र सर्वाधिक चर्चेत राहिला. गोकुळ गितेंच्या विजयाने राज्यातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








