Congress to launch agitation from June 27 over the NEET paper leak and irregularities in competitive examinations : नागपुरात मोठ्या जनआंदोलनाची ठिणगी पडणार, 27 जूनपासून काँग्रेस उतरणार रस्त्यावर
Nagpur केंद्रातील सत्ताधारी स्वतःच्या मनातील गोष्टी लादण्यासाठी ‘मन की बात’ Man ki Baat करत असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi मात्र देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या मनाचे ऐकून ‘जन की बात’ Jan ki Baat करत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर, राहुल गांधी यांनी कोटा येथील विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाच्या माध्यमातून आता नागपुरात मोठ्या जनआंदोलनाची ठिणगी पडणार आहे. येत्या २७ जूनपासून नागपूरच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दररोज दोन ठिकाणी हा व्हीडिओ दाखवून विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या हक्कासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत प्रफुल गुडधे यांनी स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित घोटाळ्याचा पर्दाफाश केला. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत आणि या ‘जन की बात’मधून स्पर्धा परीक्षांमागचे भयानक अर्थकारण आणि राजकारण समोर आले आहे.
विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकार कोट्यवधी रुपये गोळा करत असून, हा एक प्रकारचा अधिकृत भ्रष्टाचारच आहे. एकट्या नीट परीक्षेसाठी शुल्काच्या नावाखाली तब्बल १३२ लाख कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून, हा पैसा शिक्षणाचा दर्जा सुधारण्याऐवजी मंत्रालयांचा अवाजवी खर्च भागवण्यासाठी वापरला जात असल्याचा गंभीर दावा राहुल गांधी यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसून राहुल गांधी स्वतःच्या मनाची बात लादत नाहीत, तर ते लोकांच्या मनाचे ऐकून घेतात. म्हणूनच विद्यार्थ्यांची आणि पालकांची होत असलेली ही आर्थिक लूट त्यांनी देशासमोर आणल्याचे गुडधे म्हणाले.
शिक्षणाच्या बाजारीकरणावर बोट ठेवत त्यांनी पुढे आरोप केला की, भाजपचे सरकार आल्यापासून देशात नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करून तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे. विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनाच नोकऱ्या मिळाव्यात यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) लोकांना थेट वरच्या हुद्द्यांवर नियुक्त केले जात आहे. दुसरीकडे, खाजगी ट्युशन क्लासेसचा कोट्यवधींचा टर्नओव्हर असलेला व्यवसाय झाला असून, गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमधून बाहेर फेकले जावे, अशीच क्रूर व्यवस्था सध्याच्या राज्यकर्त्यांनी तयार केली आहे.
यावेळी गुडधे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूरच्याच मुद्द्यावरून थेट निशाणा साधला. फक्त देशातच नव्हे, तर खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे पेपर फुटले, मात्र इतकी गंभीर घटना घडूनही फडणवीसांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, कोणावरही ठोस कारवाई केली नाही की साधे आदेशही दिले नाहीत. यावरून हे सर्व काही वरून ठरवून केले जात असल्याचा संतप्त सवाल त्यांनी केला.
Maharashtra Vidhansabha : विकास अनुशेष भरून निघाला काय?, मुदतवाढीच्या ठरावाचे काय झाले?
शेवटी, राहुल गांधी यांनी कोटा येथील विद्यार्थ्यांसोबत केलेला ४५ मिनिटांचा संवाद हा केवळ एक संवाद नसून, ती देशातील शिक्षण व्यवस्थेची भीषण परिस्थिती मांडणारी ‘जन की बात’ आहे, असे सांगत हा संवाद शहरातील प्रत्येक चौकात दाखवून लोकांमध्ये मोठी जागृती केली जाणार असल्याचे गुडधे यांनी स्पष्ट केले. सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत आणि हा राजकीय फायदा मिळवण्याचा मुद्दाही नसून, हा सर्वसामान्य पालक आणि विद्यार्थ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, संदेश सिंगलकर, अतुल कोटेचा, विजय सराडकर, मुन्ना ओझा आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.








