Allegations surface that Buldhana’s Co-Guardian Minister Sanjay Sawkare is neglecting the district’s affairs : संजय सावकारे यांच्या अनुपस्थितीवरून राजकीय चर्चा जोरात
Buldhana बुलढाणा जिल्ह्याला राज्य शासनाने एक नव्हे तर दोन पालकमंत्र्यांची जबाबदारी दिली आहे. पालकमंत्री मकरंद पाटील हे सातत्याने जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत विकासकामांचा आढावा घेताना दिसत आहेत. विविध शासकीय बैठका, प्रशासनाशी समन्वय आणि विकास प्रकल्पांच्या पाहणीत त्यांचा सक्रिय सहभाग असल्याने त्यांची उपस्थिती जिल्हावासीयांना जाणवत आहे. मात्र सहपालकमंत्री संजय सावकारे यांची जिल्ह्यातील मर्यादित उपस्थिती सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.
नुकतीच मंत्रालयात बुलढाणा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सहपालकमंत्री म्हणून संजय सावकारे उपस्थित होते. मात्र जिल्ह्यातील विकासकामे, प्रशासनाच्या आढावा बैठका, विविध प्रश्नांवरील प्रत्यक्ष पाहणी किंवा जनतेशी संवाद या बाबींमध्ये त्यांची उपस्थिती फारशी दिसून येत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, शेती, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण यांसारखे अनेक प्रश्न ऐरणीवर असताना सहपालकमंत्र्यांनी अधिक सक्रिय भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः जिल्ह्याला दोन पालकमंत्र्यांचा लाभ मिळालेला असताना विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात एक मंत्री सातत्याने जिल्ह्यात दिसत असताना दुसऱ्या मंत्र्यांची अनुपस्थिती नागरिकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.|
राजकीय वर्तुळातही या मुद्द्यावर विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. सहपालकमंत्री पद हे केवळ औपचारिक जबाबदारी राहणार की जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, सत्ताधारी पक्षातील नेते सहपालकमंत्री मंत्रालयीन पातळीवर जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत असले, तरी जिल्ह्यातील जनतेला त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती अपेक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे.त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात सध्या सहपालकमंत्री संजय सावकारे यांचे जिल्ह्यातील दौरे आणि विकासकामांमधील प्रत्यक्ष सहभाग नेमका कधी वाढणार? हा एकच प्रश्न चर्चेत आहे.








