veteran-marathi-theatre-director-vijaya-mehta-passes-away-at-92 : मराठी रंगभूमीची ‘बाई’ काळाच्या पडद्याआड
Mumbai: मराठी रंगभूमीला आधुनिक दृष्टी, शिस्तबद्ध नाट्यप्रयोग आणि प्रयोगशीलतेची नवी दिशा देणाऱ्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि रंगकर्मी विजया मेहता यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी नाट्यसृष्टीतील एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत असून, साहित्य, रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
४ नोव्हेंबर १९३४ रोजी बडोदा येथे जन्मलेल्या विजया मेहता या पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत होत्या. त्यांचे वडील दत्तात्रय जयवंत हे थिऑसॉफिकल सोसायटीशी संबंधित होते. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयात पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये नाट्यप्रशिक्षण घेतले. ज्येष्ठ नाट्यगुरू इब्राहिम अल्काझी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रंगभूमीची सखोल साधना केली आणि पुढे स्वतःची स्वतंत्र नाट्यदृष्टी विकसित केली.
मराठी रंगभूमीवर विजया मेहता यांना प्रेमाने ‘बाई’ म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या नाटकांच्या तालमींमध्ये शिस्त, अभ्यास आणि भूमिकेची सखोल तयारी यांना सर्वोच्च महत्त्व असे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नामवंत कलाकार घडले. विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, श्रीराम लागू यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांच्या नाट्यसंस्कारांचा लाभ घेतला. कलाकार घडविणाऱ्या दिग्दर्शिका म्हणून त्यांचे नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात कायम स्मरणात राहील.
विजया मेहता यांनी ‘रंगायन’ या नाट्यचळवळीच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर प्रयोगशीलतेचे नवे पर्व सुरू केले. विजय तेंडुलकर यांच्यासह अनेक लेखक आणि कलाकारांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. नाटक हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजाशी संवाद साधणारे प्रभावी कलामाध्यम आहे, हा विचार त्यांनी आपल्या दिग्दर्शनातून सातत्याने मांडला.
अभिनेत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द तितकीच उल्लेखनीय होती. मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्यशाखेतून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. ‘झुंजारराव’ या नाटकातील कमळजा ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरली. त्यानंतर ‘संशयकल्लोळ’, ‘तुझे आहे तुझपाशी’, ‘सुंदर मी होणार’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. १९६०च्या दशकात त्या मराठी रंगभूमीवरील सर्वाधिक प्रभावी अभिनेत्री आणि दिग्दर्शकांपैकी एक बनल्या.
दिग्दर्शिका म्हणून त्यांनी अनेक गाजलेली नाटके सादर केली. ‘मला उत्तर हवंय’, ‘एका घरात होती’, ‘संध्याछाया’, ‘जास्वंदी’, ‘अखेरचा सवाल’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘बॅरिस्टर’, ‘सावित्री’, ‘पुरुष’ आणि ‘वाडा चिरेबंदी’ यांसारख्या नाटकांनी मराठी रंगभूमीला नवे विचार आणि नवी अभिव्यक्ती दिली. त्यांच्या दिग्दर्शनातील प्रत्येक नाटक आशय, मांडणी आणि अभिनयाच्या कसदारतेसाठी विशेष गाजले.
Murder in Akola : अकोल्यात काँग्रेस नगरसेविकेच्या पतीची भरदिवसा चाकूने हत्या; उपचारादरम्यान मृत्यू
भारतीय रंगभूमीचा ठसा त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटवला. इंडो-जर्मन थिएटर प्रकल्पांतर्गत त्यांनी ‘मुद्राराक्षस’, ‘शाकुंतल’, ‘हयवदन’ आणि ‘नागमंडल’ यांसारखी नाटके जर्मन रंगभूमीवर सादर केली. जर्मन दिग्दर्शक फ्रिट्स बेनव्हिट्झ यांच्यासोबत केलेल्या या प्रयोगांमुळे भारतीय आणि पाश्चात्त्य नाट्यसंस्कृतीचा प्रभावी संगम घडला.
नाटकांबरोबरच त्यांनी चित्रपट, दूरदर्शन आणि टेलिफिल्म्समध्येही उल्लेखनीय योगदान दिले. ‘हयवदन’, ‘शाकुंतल’, ‘हवेली बुलंद थी’ आणि ‘हमीदाबाई की कोठी’ या टेलिफिल्म्सचे त्यांनी दिग्दर्शन केले. ‘स्मृतीचित्रे’, ‘रावसाहेब’ आणि ‘पेस्तनजी’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनातून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. ‘पार्टी’ आणि ‘क्वेस्ट’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘झिम्मा : आठवणींचा गोफ’ या आत्मचरित्रातून त्यांनी आपल्या कलाप्रवासाचे अनुभव शब्दबद्ध केले.
वैयक्तिक आयुष्यात त्यांचा विवाह दुर्गा खोटे यांचे पुत्र हरीन खोटे यांच्याशी झाला होता. त्यांना रवी आणि देवेन ही दोन मुले झाली. हरीन खोटे यांच्या निधनानंतर त्यांनी फारोख मेहता यांच्याशी पुनर्विवाह केला. त्यांना अनाहिता ही कन्या आहे.
मराठी रंगभूमी आणि भारतीय नाट्यविश्वातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, कालिदास सन्मान, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, गो. ब. देवल पुरस्कार, विष्णुदास भावे सुवर्णपदक, मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार, पु. ल. देशपांडे पुरस्कार तसेच अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी गौरविण्यात आले.
विजया मेहता यांच्या निधनाने मराठी रंगभूमीने आपल्या सर्वाधिक प्रभावशाली दिग्दर्शिका गमावल्या आहेत. अभिनय, दिग्दर्शन, नाट्यशिक्षण आणि प्रयोगशील रंगभूमी या चारही क्षेत्रांत त्यांनी निर्माण केलेला वारसा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहणार असून, मराठी नाट्यविश्वात त्यांचे योगदान कायम अजरामर राहील.








