Strong resentment within the Youth Congress over Yajnavalkya Jichkar holding two key responsibilities simultaneously : सध्या प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस असून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिवपदही भूषवत असल्याचा रोष
Nagpur काँग्रेस पक्षाने देशभरात ‘एक व्यक्ती, एक पद’ हा नियम कडकपणे लागू केला असला, तरी नागपुरात मात्र या नियमाला उघडउघड हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त सरचिटणीस (महासचिव) याज्ञवल्क्य जिचकार यांच्याकडे एकाच वेळी दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असल्याने युवक काँग्रेसमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे.
काँग्रेसच्या धोरणानुसार नुकतीच अनेक नेत्यांना आपली दुहेरी पदे सोडावी लागली आहेत. नागपूर शहराध्यक्षपदी नियुक्ती होताच प्रफुल गुडधे यांनी आपल्या राष्ट्रीय सचिव आणि हरियाणाच्या सहप्रभारी पदाचा तातडीने राजीनामा दिला. तसेच नागपूर ग्रामीण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुंदा राऊत, प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कुणाल राऊत आणि केतन ठाकरे यांचा प्रदेश कार्यकारिणीत समावेश झाल्यानंतर त्यांनी युवक काँग्रेसची पदे सोडली. मात्र, देशातील सर्वाधिक सुशिक्षित नेते व माजी मंत्री दिवंगत श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार या नियमाला अपवाद ठरले आहेत. ते सध्या प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस असण्यासोबतच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिवपदही भूषवत आहेत. एकाच व्यक्तीकडे दोन पदे राहिल्याने इतर निष्ठावान कार्यकर्त्यांची संधी हिरावली जात असल्याची भावना युवक काँग्रेसमधून व्यक्त होत आहे. बड्या नेत्यांच्या मुलांना पक्ष नियमातून सूट देतो का? असा तिखट सवाल आता कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
Sachin Ahir : सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड
याज्ञवल्क्य जिचकार यांचा हा वाद केवळ दोन पदांपुरता मर्यादित नाही, तर त्यांच्या राजकीय भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काटोल मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सलील देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष) यांच्याविरोधात थेट बंडखोरी केली होती.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाच वेळा प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघात आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात आली होती. मात्र जिचकार यांच्या बंडखोरीमुळे मतांचे विभाजन होऊन येथे भाजपचे चरणसिंग ठाकूर निवडून आले, तर सलील देशमुख आणि जिचकार या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उघड बंड केल्याने जिचकार यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. परंतु, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदभार सांभाळताच जिचकार यांचे निलंबन मागे घेत त्यांना पक्षात मानाने परत आणले.
Raj Thackeray : ‘देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईकं मिळणारच’!
एवढेच नव्हे तर, कोणतीही प्रतीक्षा न करवता त्यांना थेट प्रदेश सरचिटणीस सारखे मोठे पद बहाल केले. आधी महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करायची, पक्षाने कारवाई केल्यानंतर पुन्हा पक्षात येऊन थेट मोठे पद मिळवायचे आणि जुने पदही सोडायचे नाही, या जिचकार यांच्या कार्यपद्धतीवर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. जिचकार यांनी तातडीने एका पदाची निवड करून दुसऱ्या पदाचा राजीनामा द्यावा आणि इतर कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. या टोकदार वादामुळे आता नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बंडखोरांना पाठिशी घालणार की ‘एक व्यक्ती, एक पद’चा नियम पाळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








