delhi-protest-opposition-demands-dharmendra-pradhan-resignation-lok-sabha-disrupted-third-day : आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, मगच चर्चा’
New Delhi: नीट पेपरफुटी प्रकरणावरून संसदेतील संघर्ष अधिक तीव्र झाला असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम राहिल्याने लोकसभेचे कामकाज सलग तिसऱ्या दिवशी ठप्प झाले. सरकारने या विषयावर चर्चेची तयारी दर्शवली असली तरी “आधी राजीनामा, नंतरच चर्चा” या भूमिकेवर काँग्रेससह विरोधी पक्ष कायम राहिल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला. अखेर वारंवार तहकूब केल्यानंतर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. गोंधळ वाढत असल्याने अध्यक्ष ओम बिरला यांनी प्रथम सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले. त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने पुन्हा कामकाज तहकूब करण्यात आले आणि अखेरीस दिवसभरासाठी सभा स्थगित करण्यात आली.
Chandrashekhar bawankule : धर्मेंद्र प्रधानांनी पेपर फोडला का?, बावनकुळेंचा काँग्रेसला सवाल
दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार नीट पेपरफुटी प्रकरणावर सविस्तर चर्चेसाठी पूर्णपणे तयार असल्याचे स्पष्ट केले. विरोधकांना जितका वेळ हवा असेल तितका वेळ चर्चा करण्यास सरकार तयार असून सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी सरकारची भूमिका फेटाळत, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रथम राजीनामा द्यावा आणि त्यानंतरच चर्चेला सुरुवात व्हावी, अशी स्पष्ट भूमिका मांडली. विरोधकांच्या या भूमिकेमुळे सरकार आणि विरोधकांमधील कोंडी आणखी वाढली.
सभागृहात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून देशातील युवक आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आणि विद्यार्थ्यांच्या आवाजाला संसदेत स्थान दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली.
यावेळी राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यामागील कारण पुन्हा स्पष्ट केले. संसदेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याची संधी मिळाली नसल्यामुळेच आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान संसदेबाहेर भूमिका मांडतात, मात्र सभागृहात या विषयावर मौन का बाळगतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही “आधी राजीनामा, नंतर चर्चा” या भूमिकेची पुनरावृत्ती केली. त्यामुळे दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणावरून सरकार आणि विरोधक आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आता संसदेच्या कामकाजावरही परिणाम करत असून, सरकार आणि विरोधकांमधील हा पेच कधी सुटणार, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
___








