Swabhimani district president slaps bank manager amid row over farm loan waiver : खामगावातील सेंट्रल बँकेत राडा; व्यवस्थापकाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल ; गुन्हा दाखल
Khamgao कर्जमाफीबाबत माहिती विचारण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याशी कथित उद्धट वागणूक दिल्याच्या आरोपावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खामगाव शाखेचे व्यवस्थापक शिवाजी कड यांना मारहाण केल्याची घटना ३० जुलै रोजी दुपारी घडली. या घटनेचा २९ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कर्जमाफीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याशी शाखा व्यवस्थापकांनी कथितपणे उद्धट भाषेत संवाद साधल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील कार्यकर्त्यांसह बँकेत गेले. यावेळी कर्जमाफीच्या मुद्यावरून शाखा व्यवस्थापक शिवाजी कड आणि अमोल पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाला.
Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी; गुन्हा दाखल
त्यानंतर संतप्त झालेल्या पाटील यांनी व्यवस्थापकाला कानशिलात चापट मारल्याचे तसेच मध्यस्थी करणाऱ्या एका कर्मचाऱ्यालाही मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. उपस्थितांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेबाबत अमोल पाटील यांनी सांगितले की, “कर्जमाफीची माहिती विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला ‘ही तुमच्या बापाची बँक आहे का?’ अशा शब्दांत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान होत असेल तर त्याविरोधात आम्ही तीव्र भूमिका घेऊ. अधिकाऱ्यांनी भाषा सुधारली नाही, तर स्वाभिमानी शैलीत उत्तर दिले जाईल.”
शाखा व्यवस्थापक शिवाजी कड यांनी हे आरोप फेटाळले आहेत. “शेतकरी वारंवार तेच प्रश्न विचारत होता. संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार मिळणारी कर्जमाफी देण्यात आली आहे. मी बैठकीत असल्याने त्यांना संबंधित फील्ड अधिकाऱ्यांकडे जाण्यास सांगितले. त्यांनी लेखी माहिती मागितल्याने स्टेटमेंट व आवश्यक पत्र देण्यास सांगितले होते. कोणतीही उद्धट भाषा वापरलेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Eknath Shinde Shivsena : शिंदेसेनेची वाशिम जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; सर्व नियुक्त्या रद्द
या घटनेनंतर बँक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून, दोन्ही बाजूंचे म्हणणे नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे तसेच बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी सन्मानाने व संवेदनशीलतेने वागावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.








