Sudhir Mungantiwar urges Union Minister to start regular services from Chandrapur to Pune, Mumbai and Delhi from Morwa Airport : मोरवा विमानतळाबाबत केंद्रीय मंत्र्यांची सकारात्मक भूमिका; चंद्रपूरहून पुणे, मुंबई व दिल्लीसाठी नियमित सेवा सुरू करण्याची मागणी
New Delhi चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देण्यासाठी मोरवा विमानतळाचा ‘उडान’ (उडे देश का आम नागरिक) योजनेत समावेश करून चंद्रपूरहून पुणे, मुंबई आणि दिल्लीसाठी नियमित हवाई प्रवासी सेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याकडे केली.
यावेळी मोरवा विमानतळाच्या विस्तारासह आवश्यक बाबींचा विचार करून चंद्रपूरसाठी नियमित हवाई सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले, त्यामुळे चंद्रपूरच्या हवाई संपर्काच्या मागणीला केंद्राच्या पातळीवर सकारात्मक दिशा मिळाली आहे. विदर्भातील औद्योगिक, खनिजसंपन्न आणि वनवैभवाने समृद्ध जिल्हा म्हणून चंद्रपूरची स्वतंत्र ओळख आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोळसा व इतर खनिजसंपत्ती असून सिमेंट उद्योग, बल्लारपूर पेपर मिल, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, धारिवाल, जीएमआर,वर्धा पॉवर यांसारखे महत्त्वाचे औद्योगिक व ऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत.
Sudhir mungantiwar : पक्षभेदांच्या पलीकडे माणुसकी; मुनगंटीवारांच्या मनगटाला कृतज्ञतेची राखी
यासोबतच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर हे देश-विदेशातील पर्यटकांचे महत्त्वाचे आकर्षण ठरले आहे. उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि प्रशासकीय क्षेत्राचा वाढता विस्तार लक्षात घेता चंद्रपूरला थेट हवाई संपर्काची आवश्यकता असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
सध्या चंद्रपूरहून नियमित विमानसेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी, उद्योजक, व्यावसायिक, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना विमानप्रवासासाठी नागपूर किंवा अन्य शहरांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे प्रवासासाठी अतिरिक्त वेळ आणि खर्च होतो. चंद्रपूरहून थेट विमानसेवा सुरू झाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय दूर होण्यासोबतच जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळू शकते.
चंद्रपूर शहरापासून सुमारे ९ किलोमीटर अंतरावर असलेला मोरवा विमानतळ या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतो. सुमारे ६२ एकर क्षेत्रात असलेल्या या विमानतळाची धावपट्टी सध्या सुमारे १ किलोमीटर असून आवश्यक तांत्रिक निकषांनुसार तिचा विस्तार केल्यास नियमित प्रवासी विमानसेवा सुरू करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. विमानतळाच्या दक्षिण-पूर्व – पश्चिम दिशेला वनविभागाची जमीन असून उत्तर दिशेला खासगी जमीन असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मोरवा विमानतळाच्या संदर्भात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील उंच बॉयलर्समुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींचाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर पुनर्विचार करावा, अशी मागणी मुनगंटीवारांनी केली. आजच्या अत्याधुनिक विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा विचार करता या बाबींचा तांत्रिक अभ्यास करून व्यवहार्य मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोरवा विमानतळाचा ‘उडान’ योजनेत समावेश झाल्यास चंद्रपूरला प्रादेशिक हवाई संपर्काच्या माध्यमातून देशातील प्रमुख शहरांशी जोडण्यास मदत होऊ शकते. विशेषतः चंद्रपूर-पुणे, चंद्रपूर-मुंबई आणि चंद्रपूर-दिल्ली या मार्गांवर नियमित सेवा सुरू करण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. या हवाई जोडणीमुळे चंद्रपूरच्या उद्योगांना बाजारपेठांशी संपर्क, विद्यार्थ्यांना शैक्षणिक केंद्रांशी जोडणी आणि ताडोबा पर्यटनाला देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिक सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकते.
मोरवा विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीही सातत्याने पाठपुरावा केला आहे. १५ ऑक्टोबर २०२५, १५ डिसेंबर २०२५ आणि २७ मार्च २०२६ रोजी त्यांच्या कार्यालयामार्फत या विषयावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला होता. आता पुन्हा किंजरापू राममोहन नायडू यांची मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.
आ. मुनगंटीवार यांच्या आग्रही मागणीची केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक दखल घेत मोरवा विमानतळाबाबत आवश्यक कार्यवाही करून चंद्रपूरसाठी नियमित हवाई सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या दीर्घकाळापासूनच्या हवाईसेवेच्या मागणीला केंद्राच्या पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, मोरवा विमानतळाच्या माध्यमातून चंद्रपूरला पुणे, मुंबई आणि दिल्लीशी जोडण्याच्या प्रयत्नांना आता अधिक बळ मिळाले आहे.








