व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Tukaram Mundhe : ‘मी इथे चहापानाला आलो नाही’; तुकाराम मुंढेंनी बैठकीत अधिकाऱ्यांना...

Tukaram Mundhe : ‘मी इथे चहापानाला आलो नाही’; तुकाराम मुंढेंनी बैठकीत अधिकाऱ्यांना फटकारले

“I’m not here for a tea party”; Tukaram Mundhe pulls up officials during a review meeting : साडेतीन तासांच्या आढावा बैठकीत शिस्तीवर भर; भेसळखोर व गुटखा माफियांवर कठोर कारवाईचे निर्देश

Amravati अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात विभागाच्या कामकाजाचा साडेतीन तास आढावा घेतला. बैठकीदरम्यान चहा दिल्यानंतर त्यांनी तो परत पाठवत, “ज्यांना चहा घ्यायचा असेल त्यांनी बैठकीबाहेर जाऊन घ्यावा. मी येथे चहापानाला आलो नाही,” अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. या प्रसंगानंतर काही काळ बैठकीत शांतता पसरली.

पदभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच विदर्भ दौरा होता. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील सुमारे २० अधिकारी बैठकीला उपस्थित होते. एप्रिल ते जून या कालावधीत विभागाने केलेल्या कारवाया, अन्ननमुने, जप्त करण्यात आलेले अन्नपदार्थ, प्रतिबंधित पदार्थांवरील कारवाई, न्यायप्रविष्ट प्रकरणे, प्राप्त तक्रारी, अन्न परवाने तसेच नोंदणी प्रमाणपत्रांचे निलंबन आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत मुंढे यांनी अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर आणि गुटखा माफियांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. “कुणाचीही तमा बाळगू नका. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ठोस कारवाई करा,” असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. विभागातील रिक्त पदे लवकरच भरली जातील, अशी माहिती त्यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.

Vijay Wadettiwar : भाजप सोडा, काँग्रेसमध्ये या अन् मुख्यमंत्री व्हा, विजय वडेट्टीवारांची पंकजा मुंडेंना खुली ऑफर

‘अॅसिलॉक’ प्रकरणातील कारवाईबाबत समाधान

राज्यात ‘अॅसिलॉक’ औषधासंदर्भात करण्यात आलेल्या कारवाईबाबत आयुक्त मुंढे यांनी समाधान व्यक्त केले. कमी मनुष्यबळ असूनही अधिकारी व कर्मचारी चांगले काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

बैठकीच्या अखेरीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी

सुरुवातीला शांत वातावरणात सुरू झालेली बैठक शेवटच्या टप्प्यात अधिकाऱ्यांच्या कामकाजावरील नाराजीमुळे चांगलीच तापली. काही बाबींवर मुंढे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांना ‘मुंढे पॅटर्न’चा अनुभव आला.

‘नागरिकांना सुरक्षित अन्न व औषधे देणे हेच उद्दिष्ट’

‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना तुकाराम मुंढे यांनी विभागाच्या कारवाईमागील भूमिका स्पष्ट केली. नागरिकांना सुरक्षित अन्न आणि सुरक्षित औषधे उपलब्ध करून देणे हेच विभागाचे प्रमुख उद्दिष्ट असून, कारवाईचा हेतू कुणालाही त्रास देण्याचा नसल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांच्या तक्रारींसाठी विभागाने स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची पडताळणी करूनच संबंधित प्रतिष्ठानांवर कारवाई केली जाते. केवळ छोट्या व्यावसायिकांवरच नव्हे, तर डेअरी, औषध उत्पादक, हॉटेल, रेस्टॉरंट, तेल व्यावसायिक आणि इतर उद्योगांवरही नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Election commission : ४७,८२० मतदारांचे पत्ते गायब; विशेष पुनरीक्षण मोहिमेसमोर मोठे आव्हान

मुंढे म्हणाले, “प्रत्येक कारवाई ही पुराव्यांच्या आधारे आणि कायद्याच्या चौकटीत केली जाते. त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही, याची विभागाकडून पूर्ण काळजी घेतली जाते.”

error: Content is protected !!