Amravati district tops in Maharashtra state in SIR campaign : आठ मतदारसंघांतील २.९४ लाख ‘असंग्रहित’ मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळणार
Amravati जिल्ह्यात मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २५ लाख ४५ हजार ६७७ मतदारांपैकी २१ लाख ३७ हजार १७२ (८३.९५ टक्के) मतदारांचे अर्ज डिजिटाइज्ड करण्यात आले आहेत.
२ लाख ९४ हजार ५९१ (११.५५ टक्के) मतदार ‘असंग्रहित’ (अनकलेक्टेबल) आढळले असून, त्यांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. त्यामुळे दुबार, मृत आणि कायम स्थलांतरित मतदारांची नावे कमी होऊन मतदार यादी अधिक अचूक होणार आहे.
एसआयआर मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९५.५३ टक्के काम पूर्ण झाले आहे. दर्यापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ९९.१२ टक्के काम पूर्ण झाल्याने तो जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. तर अमरावती विधानसभा मतदारसंघात ९०.४३ टक्के काम पूर्ण झाले असून ते सर्वात कमी आहे. डिजिटायझेशन आणि असंग्रहित मतदारांची पडताळणी या दोन्हींचा एकत्रित विचार करता अमरावती जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
Eknath Shinde : शिंदेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाजपमध्ये, दिग्गजांसह प्रवेश
बीएलओंनी केलेल्या घरभेटीदरम्यान जिल्ह्यातील १ लाख ३६ हजार ५०८ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे निदर्शनास आले. तसेच १ लाख ३ हजार ४०२ मृत मतदारांची नावे अद्याप मतदार यादीत असल्याचे आढळले. याशिवाय ४२ हजार २१७ मतदारांची दुबार नोंदणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी ८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यामधून या मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत.
एसआयआर मोहिमेत दर्यापूर विधानसभा मतदारसंघाने ९९.१२ टक्के काम पूर्ण करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघात २५.५१ टक्के अर्जांचे काम अद्याप प्रलंबित असून, तेथे एकूण ९०.४३ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, अमरावती हे महापालिका क्षेत्र असल्याने शहरी भागातील आव्हानांचा विचार करता राज्यातील इतर महापालिका क्षेत्रांच्या तुलनेत येथील प्रगती समाधानकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
असंग्रहित मतदारांची स्थिती
मृत : १,०३,४०२
अनुपस्थित : ११,५३१
कायम स्थलांतरित : १,३६,५०८
दुबार नोंदणी : ४२,२१७
इतर : ९३३
एकूण : २,९४,५९१
विधानसभानिहाय एसआयआरची प्रगती
धामणगाव रेल्वे : डिजिटायझेशन ८६.२८%, एकूण काम ९८.१९%
बडनेरा : ७८.५७%, एकूण ९२.४३%
अमरावती : ७५.५१%, एकूण ९०.४३%
तिवसा : ८२.१३%, एकूण ९६.२७%
दर्यापूर : ८९.८२%, एकूण ९९.१२%
मेळघाट : ८५.९७%, एकूण ९४.९९%
अचलपूर : ८६.७६%, एकूण ९६.८७%
मोर्शी : ९०.१०%, एकूण ९७.९७%








