व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Eknath Shinde : शिंदेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाजपमध्ये, दिग्गजांसह प्रवेश

Eknath Shinde : शिंदेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाजपमध्ये, दिग्गजांसह प्रवेश

Former district chief of Eknath Shinde Shivsena joins the BJP : पालकमंत्र्यांनाही रोखता आली नाही राष्ट्रवादीची गळती; शिवसेने(शिंदे)तील नाराजीचाही परिणाम?

Washim जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील राजकारणाला मोठे वळण मिळाले आहे. शिवसेने (शिंदे)चे माजी जिल्हाप्रमुख विजय खानझोडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), उद्धवसेना आणि इतर पक्षांतील अनेक माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेने (शिंदे)तील काही प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. सोमवारी झालेल्या पक्षप्रवेशामुळे त्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले. वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे राष्ट्रवादीची जिल्ह्यातील जबाबदारी असतानाही पक्षातील गळती रोखता आली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे, अलीकडेच शिवसेने (शिंदे)ची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या नाराजीचेही पडसाद या पक्षप्रवेशात उमटल्याचे बोलले जात आहे.

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार श्याम खोडे, आमदार सई डहाके आणि जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेने (शिंदे)चे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती विजय खानझोडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन रोकडे, मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक तथा माजी सभापती सुरेश गावंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग काठोळे, मंगरूळपीर पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर पाटील शेगीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, भाऊराव नाईक आणि गोविंद चव्हाण यांचा समावेश आहे. याशिवाय सहकार, ग्रामपंचायत, बाजार समित्यांतील अनेक माजी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

Akola Congress : अकोला काँग्रेसचा ‘सोशल अजेंडा’!; शहर काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

महाआघाडीलाही फटका

उद्धवसेनेशी संबंधित माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या कुटुंबातील सचिन डोफेकर आणि विश्वास गोदमले यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेवराव काकडे आणि उपसभापती गोवर्धन चव्हाण यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

भाजपची ताकद वाढली; तिकीट वाटपाचे आव्हानही

मोठ्या प्रमाणावरील या पक्षप्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वी भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे मानले जात आहे. मात्र, नव्या इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारी वाटपावेळी पक्ष नेतृत्वासमोर समतोल साधण्याचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

Nagpur municipal corporation: उंच इमारतींच्या टेरेसचा गैरवापर; नागपूर महापालिकेची कारवाई, ७ सर्वेक्षण पथके नेमली

शिवसेना (शिंदे)तील नाराजीचा परिणाम?

*शिवसेने (शिंदे)ची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर काही प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या नाराजीचे राजकीय परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून येऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, याबाबत संबंधित पक्षांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

error: Content is protected !!