delhi-reservation-hatao-andolan-police-permission-ramlil : रामलीला मैदानात ५०० जणांना पोलिसांची परवानगी
New Delhi : जातीनिहाय आरक्षणाच्या विरोधात प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘आरक्षण हटाव’ आंदोलनाला अखेर दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले असून शुक्रवारपासून रामलीला मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही अटी घालून ही परवानगी देण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या परवानगीनुसार, आंदोलनासाठी सायंकाळी चार वाजेपर्यंत जास्तीत जास्त ५०० जणांना उपस्थित राहता येणार आहे. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी आयोजकांना काही स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पोलिसांच्या निर्देशांचे पालन न झाल्यास दिलेले ना हरकत प्रमाणपत्र कोणत्याही वेळी रद्द केले जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
‘आरक्षण हटाव’ आंदोलनासाठी आयोजकांकडून जंतर मंतरची मागणी करण्यात आली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलनास परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर रामलीला मैदानावर आंदोलन आयोजित करण्यास पोलिसांनी हिरवा कंदील दिला आहे.
दिल्ली पोलिसांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील आपल्या अधिकृत माध्यमातून आंदोलनाच्या परवानगीबाबत स्पष्टीकरण दिले. रामलीला मैदानासाठी परवानगी देण्यात आली असली, तरी आंदोलनाच्या ठिकाणी मोर्चा काढणे किंवा मुक्काम करणे यास परवानगी नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
‘आरक्षण हटाव’ आंदोलनाच्या माध्यमातून जातीनिहाय आरक्षणाला विरोध करण्यात येत आहे. आरक्षणामुळे गुणवत्तेला पुरेसे महत्त्व मिळत नाही, जातीय आधारावरील भेदभाव वाढतो आणि शिक्षण तसेच रोजगार क्षेत्रातील स्पर्धेवर परिणाम होतो, असा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
जातीनिहाय आरक्षणाऐवजी गुणवत्तेला प्राधान्य देत सर्व नागरिकांना समान संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलनाच्या आयोजकांकडून करण्यात येत आहे. या मागणीसाठी देशातील तरुण आणि नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीनंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून या आंदोलनाला वेग मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावरही ‘आरक्षण हटाव’ मोहिमेचा प्रचार वाढला असून नागरिक आणि तरुणांना दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे.इन्स्टाग्रामवर या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. या मोहिमेला ५.६ दशलक्ष फॉलोअर्स मिळाल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
रामलीला मैदानावर आंदोलनाला परवानगी देताना दिल्ली पोलिसांनी आयोजकांवर काही निर्बंध घातले आहेत. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. मोर्चा काढणे, आंदोलनस्थळी मुक्काम करणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशा कोणत्याही प्रकारच्या कृतीस परवानगी नसणार आहे. दरम्यान, आंदोलनाला परवानगी मिळाल्यानंतर आता शुक्रवारी रामलीला मैदानावर किती नागरिक उपस्थित राहतात आणि आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
___








