With the strength of the Constitution and the energy of youth, anyone can become Chief Minister, says Fadnavis in an interaction with Gen Z : ‘युवा मंथन’ कार्यक्रमात राजकीय प्रवासातील महत्त्वाच्या आठवणींना उजाळा
Nagpur मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मोठ्या पदावर पोहोचणे ही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही. ही भारताच्या संविधानाची आणि युवाशक्तीची ताकद आहे, ज्यामुळे सामान्य पार्श्वभूमी असलेली व्यक्तीही या पदावर पोहोचू शकते, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर येथे आयोजित ‘युवा मंथन’ कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील महत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला.
विचाराने प्रेरित होऊन राजकारणात प्रवेश
आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा सत्तेत येण्याचा किंवा मुख्यमंत्री होण्याचा कोणताही विचार मनात नव्हता. मी केवळ एका विशिष्ट विचाराने प्रेरित होऊन पक्षात काम करू लागलो. राजकारण हा माझा व्यवसाय नसून, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे ते एक प्रभावी माध्यम आहे.
१८ व्या वर्षी अटक ते राममंदिर आंदोलन
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील आपल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना त्यांनी उल्लेख केला, मी १८ वर्षांचा असताना जम्मू-कश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी मला अटक झाली होती. परंतु, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिथे तिरंगा पूर्ण अभिमानाने फडकत आहे, ही खरी सुरुवात होती.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, वय वर्ष २० असताना मी राममंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि सुमारे २० दिवस तुरुंगात घालवले. आज मुख्यमंत्री झाल्यानंतर रोज एक नवीन आव्हान स्वीकारत लोकांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणे हाच सर्वात कठीण, पण महत्त्वाचा प्रवास आहे.
आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. जर एखाद्या व्यक्तीने दृढ निश्चय केला, तर ती मुख्यमंत्री किंवा कोणत्याही पदावर पोहोचू शकते; एवढी मोठी ताकद आपल्या संविधानाने सामान्य नागरिकाला दिली आहे,असे ते म्हणाले.
Eknath Shinde : शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घ्या
विरोधकांवर मिश्कील टिप्पणी करत ते शेवटी म्हणाले, कधीकधी असे वाटते की विरोधक केवळ राजकारण पाहण्यासाठीच निर्माण झाले आहेत. तरुण पिढीने ध्येय ठरवून आणि दृढ निश्चयाने समाजपरिवर्तनासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.








