व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Manoj Jarange : ‘मुंबईत ४५ लाख गाड्या येणार!’; मनोज जरांगेंनी थेट आकडाच...

Manoj Jarange : ‘मुंबईत ४५ लाख गाड्या येणार!’; मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला

manoj-jarange-patil-45-lakh-vehicles-mumbai-maratha-protest : ‘भगवं वादळ’ राजधानीत धडकण्याचा इशारा, सरकारसमोर मोठं आव्हान

Jalna : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची मोठी गर्दी होत आहे. राज्याच्या विविध भागांतून मराठा बांधव जालन्याच्या दिशेने रवाना होत असताना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशारा त्यांनी यापूर्वीच दिला असून, आता मुंबईत किती वाहनांसह मराठा बांधव दाखल होणार, याबाबत त्यांनी थेट आकडा सांगितला आहे.

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत तब्बल ४५ लाख गाड्या येणार असल्याचा दावा केला. मुंबईत जाण्याची तयारी सुरू असल्याचे सांगत त्यांनी सरकारला मागण्या मान्य करण्याचे आवाहन केले. सरकारने विनाकारण संघर्षाची भूमिका घेऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेत कोणताही बदल नसल्याचे स्पष्ट केले आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने चर्चेसाठी कधीही यावे, चर्चा करण्यास आपली तयारी आहे; मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आपण आंदोलनाच्या ठिकाणाहून हलणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. मराठा समाजातील तरुणांचे भवितव्य चांगले होऊ नये, अशी सरकारची भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणूनबुजून काही निर्णय घेत असल्याचा आरोप करत त्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा छुपा पाठिंबा असल्याचेही जरांगे यांनी म्हटले. मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून हे घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Gunratna Sadavarte : ‘मुख्यमंत्री बिगरमराठा असल्यानेच जरांगेंचं आंदोलन’

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला यापूर्वीच मुंबई आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागण्यांवर लवकर तोडगा निघाला नाही, तर अंतरवाली सराटी येथून मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करेल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर आंदोलन करण्याची इच्छाही जरांगे यांनी यापूर्वी व्यक्त केली आहे. त्यामुळे अंतरवाली सराटीतील आंदोलनाचा पुढील टप्पा मुंबईत पोहोचला तर सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर अंतरवाली सराटीच्या दिशेने मराठा समाजातील कार्यकर्ते आणि आंदोलक मोठ्या संख्येने रवाना होत आहेत. मराठवाड्यासोबतच गोदाकाठच्या भागातून तसेच पश्चिम महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने आंदोलक जालन्याकडे येत असल्याचे चित्र आहे. आंदोलनाची व्याप्ती वाढत असतानाच विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरही आंदोलनांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातून मराठा बांधव मोठ्या तयारीनिशी अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. दासखेड गावातून चार पिकअप वाहनांमधून आंदोलक निघाले असून, त्यांनी जवळपास महिनाभर पुरेल एवढे साहित्य आणि राशन सोबत घेतल्याचे सांगितले. आंदोलनानंतर मुंबईकडे जाण्याचीही तयारी असल्याचे या आंदोलकांनी स्पष्ट केले. गावपातळीवर कुणबी नोंदी उपलब्ध असूनही प्रमाणपत्र दिले जात नसल्याचा आरोप करत या मागणीसाठी आंदोलनात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातही आंदोलन करण्यात आले. केऱ्हाळा फाटा येथे समर्थकांनी रास्ता रोको करत छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील वाहतूक रोखली. यावेळी बेमुदत रास्ता रोकोचे फलक लावण्यात आले. त्यामुळे आंदोलनाचा प्रभाव केवळ अंतरवाली सराटीपुरता मर्यादित न राहता राज्यातील इतर भागांतही जाणवू लागल्याचे चित्र आहे.

Mumbai-Marathi-Language-Issue : मुंबईत मराठीवरून पुन्हा रान पेटणार! फडणवीसांच्या ‘यू-टर्न’वर मनसे आक्रमक

एकीकडे अंतरवाली सराटी येथे आंदोलनासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज जमा होत असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईसाठी ४५ लाख गाड्यांचा आकडा सांगितल्याने या दाव्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलक दाखल झाल्यास वाहतूक, कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे सरकार आणि प्रशासन या आंदोलनाकडे कोणत्या पद्धतीने पाहतात, तसेच मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अंतरवाली सराटीतील आंदोलनाची पुढील दिशा काय असेल आणि सरकारसोबत चर्चेतून काही तोडगा निघणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. जर मागण्यांवर समाधानकारक निर्णय झाला नाही, तर मुंबईकडे मोठ्या संख्येने कूच करण्याची तयारी असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केल्याने आगामी काळात मराठा आंदोलनाची धग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

___

error: Content is protected !!