‘Feeding gomata puran poli is not enough; take a concrete stand on cow protection,’ Shivsena challenges Congress : पुरणपोळीवरून राजकारण; शिवसेना शहरप्रमुखांचे काँग्रेस आमदारांना आव्हान
Akola पोळ्याच्या दिवशी अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी छत्रपती शिवाजीनगर परिसरातील कोनवाड्यात जाऊन गोमातेला पुरणपोळी खाऊ घातली. या उपक्रमाचे स्वागत करतानाच गोवंश संरक्षणाच्या मुद्द्यावर आमदारांनी केवळ प्रतीकात्मक कार्यक्रम न करता ठोस भूमिका घ्यावी, असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेश मिश्रा यांनी दिले आहे.
गोमातेला पुरणपोळी खाऊ घालून हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करण्याचा प्रयत्न केला, त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र, अकोला शहरातील ज्या भागांमध्ये गोवंशाची अवैध वाहतूक किंवा कत्तलीबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात, त्या प्रकरणांमध्ये प्रशासनाकडे पाठपुरावा करून कायदेशीर कारवाईसाठी आमदार पुढाकार घेणार का, असा सवाल मिश्रा यांनी उपस्थित केला.
अकोला पश्चिम मतदारसंघातील नागरिकांच्या मनातील या प्रश्नाचे आमदारांनी स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. गोवंशाची अवैध वाहतूक, कत्तल किंवा बेकायदेशीर कत्तलखान्यांबाबत तक्रारी असल्यास त्याची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार कारवाई व्हावी, यासाठी आमदार स्वतः प्रशासनाकडे पाठपुरावा करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नुसत्या प्रतीकात्मक कार्यक्रमातून किंवा फोटोसेशनमधून जनतेचा विश्वास संपादन करता येत नाही. प्रत्यक्ष कृतीतून भूमिका सिद्ध करावी लागते. त्यामुळे गोवंश संरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार साजिद खान पठाण यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करून दाखवावी, असे आव्हान मिश्रा यांनी दिले. अशी ठोस भूमिका घेतल्यास त्याचे सर्व समाजातील नागरिक स्वागत करतील, असेही त्यांनी म्हटले.








