nila-vikhe-patil-sweden-parliament-maharashtra-vikhe-patil-connection : नीला विखे पाटील यांची रिक्सदागमध्ये दमदार एन्ट्री
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारण, शिक्षण आणि सहकार क्षेत्राशी घट्ट नाते असलेल्या विखे पाटील कुटुंबाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या ३४९ सदस्यीय संसदेत म्हणजेच रिक्सदागमध्ये निवड झाली आहे.
स्टॉकहोम शहर मतदारसंघातून त्यांनी ग्रीन पार्टीच्या उमेदवार म्हणून संसदेत प्रवेश केला. स्वीडनच्या अधिकृत संसदीय नोंदीनुसार नीला विखे पाटील या ग्रीन पार्टीच्या सदस्य असून त्यांचा मतदारसंघ स्टॉकहोम शहर आहे. नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला, तरी त्यांच्या बालपणाचा महत्त्वाचा काळ अहिल्यानगरमध्ये गेला. पुढे उच्च शिक्षण आणि व्यावसायिक कारकिर्दीसाठी त्यांनी युरोपमध्ये विविध ठिकाणी शिक्षण घेतले.
अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी माद्रिदमधील विद्यापीठातून व्यवस्थापनशास्त्राचे उच्च शिक्षण पूर्ण केले. स्वीडिश, इंग्रजी आणि स्पॅनिश या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. स्वीडिश राजकारणात नीला यांची वाटचाल दीर्घकाळापासून सुरू आहे. त्यांनी माजी पंतप्रधान स्टेफान लोफवेन यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम केले. वित्त, करप्रणाली आणि गृहनिर्माण यांसारख्या विषयांवर त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यानंतर स्टॉकहोम शहराच्या राजकारणातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. ग्रीन पार्टीच्या विविध संघटनांमध्ये काम करत त्यांनी आपली राजकीय ओळख निर्माण केली.
स्वीडनच्या १३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सोशल डेमोक्रॅटिक पार्टीला ९९ जागा मिळाल्या, तर ग्रीन पार्टीला २२ जागा मिळाल्या. अंतिम निकालानुसार सोशल डेमोक्रॅट्स, डावे, सेंटर आणि ग्रीन पार्टी या चार पक्षांकडे मिळून १७६ जागा आहेत. दुसरीकडे, सत्ताधारी आघाडीतील पक्षांकडे १७३ जागा राहिल्या.
नीला विखे पाटील यांनी आपल्या विजयाबद्दल आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणी सांगताना, वयाच्या १५व्या वर्षी त्यांनी आपल्याला राज्याचा अर्थसंकल्प वाचायला लावल्याचे नमूद केले.
महाराष्ट्राशी असलेले आपले नातेही त्यांनी कायम जपल्याचे सांगितले आहे. बालकल्याण, पर्यावरण आणि ज्यांना मतदानाचा अधिकार नाही अशा घटकांचा आवाज बनण्यावर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची भूमिका आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार क्षेत्रात उभारलेल्या पायाभरणीपासून बाळासाहेब विखे पाटील यांच्या राष्ट्रीय राजकारणापर्यंत आणि आता नीला विखे पाटील यांच्या स्वीडिश संसदेतील प्रवेशापर्यंत विखे कुटुंबाच्या कार्याचा प्रवास महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे.
__








