rahul-bondre-bjp-entry-chikhli-buldhana-congress-22-september-2026 : २२ सप्टेंबरला मुंबईत पक्षप्रवेशाची शक्यता
Mumbai : बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
अखेर राहुल बोंद्रे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत या चर्चांना स्पष्ट दिशा दिली आहे. त्यामुळे चिखलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष आता त्यांच्या पुढील पावलाकडे लागले आहे. बोंद्रे यांनी आपल्या राजकीय प्रवासाला २५ वर्षांहून अधिक काळ पूर्ण झाल्याचे सांगत चिखली मतदारसंघातील नागरिकांशी असलेल्या आपल्या संबंधांचा उल्लेख केला. राजकारणाकडे त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने व्यवसाय म्हणून नव्हे, तर जनसेवेचे माध्यम म्हणून पाहिले, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रदीर्घ प्रवासात काँग्रेस पक्षाने आपल्याला अनेक संधी दिल्या, विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली आणि अनेक जिव्हाळ्याची माणसे जोडली गेली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसमधील आपल्या सहकाऱ्यांविषयी कृतज्ञताही व्यक्त केली.
मुकुल वासनिक यांनी आपल्या राजकीय वाटचालीच्या सुरुवातीच्या काळात मार्गदर्शन केले, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भावाप्रमाणे प्रेम दिल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय वाट वेगळी निवडली असली तरी आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विसरणार नसल्याचेही बोंद्रे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची तारीख २२ सप्टेंबर असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनीही २२ सप्टेंबरची तारीख पक्षप्रवेशासाठी सांगण्यात आल्याचे नमूद केले आहे.
Nila Vikhe Patil : महाराष्ट्राच्या विखे घराण्याची लेक स्वीडनच्या संसदेत
चिखली मतदारसंघात गेल्या काही काळापासून विविध राजकीय घडामोडींमुळे वातावरण चर्चेत आहे. अशा पार्श्वभूमीवर राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश झाल्यास स्थानिक राजकारणातील समीकरणांमध्ये काय बदल होतो, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असेल. बोंद्रे यांच्यासोबत त्यांचे समर्थक आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का, याबाबतची अंतिम स्पष्टता पक्षप्रवेशाच्या वेळी होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे असताना त्यांच्या जिल्ह्यातील माजी आमदाराने भाजपची वाट धरल्याने या घडामोडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, राहुल बोंद्रे यांच्या पुढील राजकीय भूमिकेचा स्थानिक पातळीवरील परिणाम काय असेल, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
__








