omraje-nimbalkar-ranajagjitsinha-patil-cm-fadnavis-drought-farmer-issue : ओमराजे म्हणाले, “तोंड पाहण्याचीही इच्छा नसते, पण शेतकऱ्यांसाठी….
Dharashiv : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी राणा जगजितसिंह पाटील एकाच गाडीत दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. या प्रसंगाबाबत विचारले असता निंबाळकर यांनी, “मला त्यांचे तोंड पाहण्याचीही इच्छा नसते; मात्र मुख्यमंत्री स्वतः बोलवत असतील आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत असेल, तर लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे आहे,” अशी भूमिका मांडली.
निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी त्यांचा संघर्ष हा न्यायालयीन पातळीवर सुरू असून तो कायद्याच्या चौकटीतच लढला जाईल. व्यक्तीगत राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात निलंगा तालुक्यातील जाऊ, औसा तालुक्यातील खरोसा, धाराशिव तालुक्यातील करजखेडा, कळंब तालुक्यातील मलकापूर आणि बार्शीतील धानोरे या भागांची पाहणी करण्यात आली. अनेक ठिकाणी सोयाबीनचे पीक हिरवे दिसत असले, तरी प्रत्यक्षात शेंगा लागलेल्या नसल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. एका एकरासाठी २० ते २५ हजार रुपये खर्च करूनही हातात उत्पन्न न उरण्याची परिस्थिती असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
Draught relief : खचून जाऊ नका, प्रत्येक बाधिताला मदत करू; मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना शब्द
पीक विम्यासाठी केवळ उपग्रह प्रतिमांवर आधारित उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोग आणि प्रशासनाच्या पंचनाम्यांच्या आधारे नुकसानभरपाई निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. धाराशिव जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असून आगामी काळातील पाणीटंचाईची गंभीर शक्यता असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत, आवश्यक सवलती, पाणी व चाऱ्याची व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे निंबाळकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाची अधिसूचना लवकर जारी करण्याबाबत तसेच शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
Uddhav Thackeray : पंचनाम्यासाठी ५ ऑक्टोबरची वाट का? महायुती सरकारवर उद्धव ठाकरेंचा सरकारवर सल्ला
दरम्यान, करजखेडा येथे सहा वर्षांचा एक विद्यार्थी सायकलवरून मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आला. त्याने शिक्षणाच्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. या घटनेचा उल्लेख करत निंबाळकर यांनी, दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नसून शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावरही होत असल्याचे सांगितले. “राजकारणातील मतभेद आपापल्या जागी आहेत; मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवणे ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे,” असे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.








