काँग्रेस प्रवक्त्यांचा आरोप; पीक विमा, लाडकी बहीण योजना आणि पेपरफुटीवरून सरकारवर टीका
Yavatmal : राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सरकारी कंत्राटदार सरकारी धोरणांमुळे अडचणीत आले असून, सरकार त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केला. यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर यंदा कोरड्या दुष्काळामुळे हातचे पीक गेले आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याचे पवार म्हणाले. पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना लाभ दिला नाही. या कंपन्यांकडून सरकार निवडणूक निधी घेते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
केंद्र सरकार महाराष्ट्रातून कर गोळा करते; मात्र संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात केवळ आठ हजार कोटी रुपये मिळाल्याचे पवार म्हणाले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे पुढे काय झाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मतपेटीचे तोंड लहान, मतपत्रिका मोठी; मतदानातील तांत्रिक अडचणींवर मुनगंटीवारांचा संताप!
विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली; मात्र निवडणुकीनंतर कोणतेही स्पष्ट कारण न देता अनेक महिलांची नावे वगळून मदत बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. कोणतेही निकष न लावता ही मदत सुरू ठेवण्याची मागणीही त्यांनी केली.सरकारी कंत्राटदारांची देयके प्रलंबित असल्याने अनेक कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आर्थिक तरतूद नसताना कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर केली जात असल्याची टीका पवार यांनी केली. दुसरीकडे, एमपीएससी आणि इतर परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, या प्रकरणांतील आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मनोज जरांगे यांनी व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपमधील कथित संभाषण गंभीर असून, त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केली. या क्लिपमध्ये एका खासदाराचेही नाव असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यातील मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची चर्चा होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाढवण बंदरविरोधी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी नियोजन होत असल्याचा दावाही त्यांनी केला. पत्रपरिषदेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन नाईक, शशांक केंडे, कुणाल जानकर, गौरव राठोड आदी उपस्थित होते.
____








