व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण टक्का वाढला, धक्का कुणाला?; नागपूर पदवीधर निकालाची धाकधूक

टक्का वाढला, धक्का कुणाला?; नागपूर पदवीधर निकालाची धाकधूक

विक्रमी ६५ टक्के मतदान; पहिले दोन तास वेग होता कमी

Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्‍या तब्बल ६५ टक्के विक्रमी मतदानामुळे राजकीय वर्तुळातील सर्वच गणिते बदलली आहेत. एरवी ५० ते ५५ टक्क्यांवर रेंगाळणारा टक्का यंदा अचानक उंचावल्याने मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, वाढलेला हा टक्का नेमका कोणाला धक्का देणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मागील निवडणुकीतील पराभवाचे शल्य मनात ठेवणाऱ्या भाजपने यंदाची निवडणूक अक्षरशः प्रतिष्ठेची केली होती. पहिल्या दोन तासात सरासरी १० टक्के मतदानाची नोंद होताच भाजपने सार्वत्रिक निवडणुकीसारखी ताकद कामाला लावली. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात मुक्काम ठोकून विविध बुथवर जात आढावा घेतला. बुथवरून मतदारांना फोन करणे, त्यांना घराबाहेर काढून केंद्रापर्यंत आणणे आणि अनुपस्थित मतदारांचा सक्तीचा पाठपुरावा करणे यासाठी चोख फिल्डिंग लावली गेली. अंतर्गत नाराजी, उमेदवारीवरून झालेले मतभेद आणि बंडखोरीचे सावट झुगारत भाजपच्या आकडे पंडितांनी पहिल्या पसंतीची तब्बल ७० हजार मते मिळवण्याचा दावा केला आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्सीखेच! तिन्ही पक्षांचा दावा, सत्तावाटपाचा तिढा !

दुसरीकडे, भाजपसारखी यंत्रणा राबवली नसली तरी काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी आपल्या विजयाचा दावा कायम ठेवला आहे. पदवीधर मतदार सुज्ञ असून त्याला कोणाला मतदान करायचे याची पूर्ण जाण आहे, असा युक्तिवाद काँग्रेसकडून केला जात आहे. मतदारांना घराबाहेर काढण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते फारसे आक्रमक नसले आणि दुपारनंतर काही बुथ ओस पडले असले, तरी आमचे पारंपरिक आणि पक्के मतदार आमच्या पाठीशी असल्याचा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे.
एकंदरीत, भाजपची यंत्रणा आणि मुख्यमंत्र्यांचा थेट सहभाग विरुद्ध काँग्रेसचा सुज्ञ मतदारांवरील विश्वास या संघर्षात मतदानाचा टक्का वाढल्याने उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर झालेली क्रॉस व्होटिंग आणि अवैध मतांची संख्या निकाल काय लागणार, हे ठरवण्यात निर्णायक ठरणार असून, खरा धक्का कुणाला बसणार हे मंगळवारीच स्पष्ट होईल.

 

error: Content is protected !!