राज्यभरात संपर्क वाढविण्याचे आव्हान, जिल्हा परिषदेतून सुरू झाले राजकारण
Nagpur नागपूर जिल्हा परिषदेच्या आणि नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सुनिता गावंडे यांच्याकडे काँग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली असून, त्यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजकीय अनुभव आणि दांडगा जनसंपर्क असलेल्या नेत्याच्या हाती धुरा आल्याने महिला कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
यापूर्वी यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांनी पाच वर्षांहून अधिक काळ प्रदेशाध्यक्षपद भूषवले. मात्र, त्यांचा कार्यकाळ बैठका आणि यवतमाळपुरताच मर्यादित राहिल्याची चर्चा होती.
आता सुनिता गावंडे यांच्यासमोर राज्यभरातील महिला कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवून संघटना पुन्हा तळागाळात सक्रिय करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. सध्या त्या राष्ट्रीय महासचिव पदावर कार्यरत आहेत. सुनिता गावंडे यांचा राजकीय प्रवास नागपूर जिल्हा परिषदेच्या राजकारणातून प्रकाशझोतात आला. भाजपने सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष बनल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हिंगणा आणि कामठी या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर देत शेकडो महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे.
मस्करी सुरू होती, आमचे नाते भावा-बहिणीसारखेच, दोन्ही खासदारांचे स्पष्टीकरण
यापूर्वी वर्धा ही कर्मभूमी असलेल्या प्रभा राव यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा काळ राजकारणात चांगलाच गाजला होता. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सरकारवर त्यांची पकड होती. त्यानंतर संध्या सव्वालाखे यादेखील यवतमाळ जिल्ह्याच्याच होत्या. आता पुन्हा एकदा विदर्भातीलच सुनिता गावंडे यांच्या खांद्यावर ही धुरा आली असून, त्या लवकरच नियमित प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात अनेक महिलांना नेतृत्वाची संधी मिळणार असून, अशा कर्तबगार महिलांना शोधून त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे शिवधनुष्य आता सुनिता गावंडे यांना पेलावे लागणार आहे.








