‘जेन-झी’च्या मतांकडे दुर्लक्ष करू नका; विधेयकाचा अभ्यास करून निर्णय घेण्याचा सल्ला
Amravati मतदारसंघ पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) प्रस्तावित विधेयकावरून महाविकास आघाडीत मतभेद उफाळून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाला समर्थन देण्याबाबत सूचक भूमिका मांडल्यानंतर काँग्रेसच्या युवा नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनी त्याला विरोध दर्शविला आहे. यापूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनीही सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद समोर येऊ लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरण आणि सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चाही सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावल्या आहेत. “माझा भाऊ गेला तेव्हाच विलीनीकरणाचा विषय संपला. त्यामुळे सत्तेत जाण्याचा प्रश्नच येत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, डिलिमिटेशन विधेयकाबाबत विचार करण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांना नताशा आव्हाड यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. प्रस्तावित डिलिमिटेशन विधेयकाचा सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घ्यावा, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या निर्णयाकडे आमचे बारीक लक्ष राहील. लोकशाही वाचविण्याच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
झेडपी निवडणुकांचे वेळापत्रक लांबणीवर?; प्रशासनापुढे दुष्काळ व्यवस्थापनाचे आव्हान
यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाने पक्षातील तरुण नेते आणि ‘जेन-झी’च्या मतांकडे दुर्लक्ष करू नये, असा सूचक इशाराही शिवानी वडेट्टीवार यांनी दिला.
नताशा आव्हाड यांचा स्पष्ट विरोध
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष डिलिमिटेशन विधेयकासंदर्भात विचार करू शकतो, अशा आशयाची पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यावर नताशा आव्हाड यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ‘माझा पक्ष डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने जाण्याचा विचार करत असेल, तर मी पक्षाच्या भूमिकेचा निषेध करते,’ असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील नव्या पिढीची भूमिका आणि नेतृत्वाच्या निर्णयांमधील अंतर चर्चेत आले आहे.
स्वतंत्र विदर्भासाठी ७ डिसेंबरला विधानभवनावर धडक, ‘मिशन २०२७’ चा संकल्प
विजय वडेट्टीवारांनीही भूमिका केली स्पष्ट
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुप्रिया सुळे यांना या विधेयकाला समर्थन द्यायचे असेल, तर त्यांनी खुशाल द्यावे; मात्र, त्यासाठी काँग्रेसचे नाव पुढे करू नये, असे त्यांनी सुनावले.
काँग्रेसने यापूर्वी मतदारसंघांच्या पुनर्रचनेदरम्यान केवळ आरक्षित मतदारसंघांमध्ये बदल केले होते. मतदारसंघांची संख्या वाढविली नव्हती किंवा राजकीय सोयीनुसार मतदारसंघांचे तुकडेही केले नव्हते, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
एकीकडे डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर विरोधकांमध्ये एकमताची अपेक्षा असताना, दुसरीकडे आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत. विशेष म्हणजे, या वादात युवा नेत्यांनीही उघडपणे भूमिका मांडल्याने महाविकास आघाडीसमोरील राजकीय पेच वाढण्याची शक्यता आहे.








