कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद
Mumbai : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या अधिकारावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुनावणीवेळी शिंदे गटाच्या पक्षफुटीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत या फुटीमागे भाजपची मदत असल्याचा दावा केला. शिवसेनेतील बंड पूर्वनियोजित होते आणि त्याची तयारी आधीपासूनच सुरू होती, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यामुळे शिवसेनेच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील वादात ठाकरे गटाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती. यावेळी सिब्बल यांनी २२ जून रोजी झालेल्या बैठकीचा संदर्भ देत तत्कालीन मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी बैठकीसंदर्भातील पत्र सर्व आमदारांना पाठवले होते, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेत फूट पाडण्याची तयारी झाली होती. या संपूर्ण घडामोडी ठरवून घडवण्यात आल्या आणि त्यामध्ये भाजपची मदत होती, असा दावा त्यांनी केला.
भाजप-ठाकरे गटात पत्रकयुद्ध; नितीन देशमुखांच्या टीकेने भाजप नेते अस्वस्थ?
शिंदे गटाकडून ही फूट पक्षांतर्गत असल्याचा युक्तिवाद केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत सिब्बल यांनी महत्त्वाचा प्रश्न विचारला. जर हा केवळ पक्षांतर्गत वाद होता, तर मग हा विषय राज्यपालांकडे कसा पोहोचला? या संपूर्ण प्रकरणात राज्यपालांची भूमिका महत्त्वाची होती, असेही त्यांनी न्यायालयात नमूद केले. त्यामुळे सत्तांतराच्या प्रक्रियेतील घटनात्मक बाबींवर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आयोगाने ठाकरे गटाला पुरेशी नोटीस दिली नव्हती, असा दावा सिब्बल यांनी केला. पक्षाची संघटनात्मक रचना, पक्षांतर्गत पदे आणि संघटनेतील सदस्यसंख्या यांचा सखोल विचार न करता केवळ विधिमंडळातील आमदारांची संख्या लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आल्याचा त्यांचा आक्षेप होता.
शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुख हे महत्त्वाचे पद असून, केवळ आमदारांच्या संख्येवरून पक्षाचे नेतृत्व निश्चित करता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबतच्या आघाडीतून बाहेर पडण्याचा ठराव शिंदे गटाने केल्याचा संदर्भ देत त्या निर्णयामागील वैचारिक कारणांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
एकनाथ शिंदे हे संपूर्ण शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत नसून ते केवळ विधिमंडळ पक्षापुरते मर्यादित आहेत, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. तसेच, उद्धव ठाकरे हेच पक्ष नाहीत असे एकवेळ मान्य केले, तर मग उद्धव ठाकरे यांचे पक्षातील स्थान काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, आजची सुनावणी संपली असून पुढील बुधवारी कपिल सिब्बल पुन्हा ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करणार आहेत. शिवसेनेचे पक्षचिन्ह, पक्षाचे नेतृत्व आणि सत्तांतराच्या घटनात्मक प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या या खटल्यात पुढील सुनावणीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सिब्बल यांच्या युक्तिवादाचा न्यायालयीन निर्णयावर नेमका किती परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
___








