व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; रुग्णालयात दाखल महिलेकडेही कर्जवसुलीचा तगादा

एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; रुग्णालयात दाखल महिलेकडेही कर्जवसुलीचा तगादा

मूर्तिजापूरमधील धक्कादायक प्रकार; आजारी महिलेच्या उपचारादरम्यान हप्त्यांची मागणी,

Akola आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्जदारांकडून वसुलीसाठी खासगी वित्तीय संस्थांचे एजंट कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा प्रत्यय मूर्तिजापूर येथे आला आहे. आजारपणामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेकडे कर्जाच्या हप्त्यांची मागणी करण्यासाठी खासगी बँकेचा वसुली कर्मचारी थेट रुग्णालयात पोहोचला. उपचार घेत असतानाही महिलेचा हप्त्यांसाठी तगादा लावल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे कर्जवसुलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चर्चेत आला आहे.

मूर्तिजापूर येथील वैशाली गोपाल इंगळे या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच खासगी बँकेचा वसुली कर्मचारी रुग्णालयात पोहोचला. त्याने वैशाली इंगळे यांच्याकडे कर्जाच्या हप्त्यांची मागणी केल्याचा आरोप आहे. आजारपणामुळे रुग्णालयात असलेल्या महिलेची परिस्थिती लक्षात न घेता पैशांसाठी तगादा लावण्यात आल्याने या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

चंद्रपूरच्या श्री विठ्ठल मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जाचा निर्णय अंतिम टप्प्यात; मुनगंटीवारांचा शासन स्तरावर जोरदार पाठपुरावा!

या घटनेची माहिती मिळताच शेतकरी संघटनेचे एक पदाधिकारी रुग्णालयात पोहोचले. त्यांनी संबंधित वसुली कर्मचाऱ्याला जाब विचारत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेकडे अशा प्रकारे पैशांची मागणी करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला. यावेळी कर्मचाऱ्याला धारेवर धरण्यात आले. त्यानंतर तो तेथून निघून गेला.

दुष्काळ, नापिकीने शेतकरी आर्थिक संकटात

यंदा पावसातील अनियमितता, पिकांचे नुकसान आणि शेतीमालाला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. उत्पन्न घटल्याने कर्जाचे हप्ते भरणेही अनेकांसाठी कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत खासगी वित्तीय संस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही साशंकता; विमानतळ भूसंपादनाला विरोध कायम!

सक्तीच्या वसुलीला आळा बसणार कधी?

कर्जवसुली करताना कर्जदारांशी सन्मानाने वागणे आणि निर्धारित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वारंवार संपर्क साधणे, मानसिक दबाव टाकणे किंवा अयोग्य पद्धतीने वसुली करणे याबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्या आहेत. सक्तीच्या वसुलीला आळा घालण्याबाबत सरकारकडून निर्देश दिले जात असल्याचे सांगितले जात असतानाच मूर्तिजापूरमधील घटनेने त्यांच्या अंमलबजावणीचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची संबंधित बँकेने दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेलाही कर्जवसुलीच्या तगाद्याला सामोरे जावे लागत असेल, तर सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा मिळणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

error: Content is protected !!