खराब हवामानाचा फटका; जयकुमार गोरे चार तास उशिराने अमरावतीत दाखल
Amravati प्रतिकूल हवामानामुळे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या अमरावती दौऱ्यात व्यत्यय आला. खराब हवामानामुळे बेलोरा विमानतळावर त्यांच्या विमानाला उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांना नागपूरला जावे लागले. परिणामी, नियोजित वेळेपेक्षा तब्बल चार तास उशिराने ते अमरावतीत दाखल झाले.
पुण्याहून येणारे विमान नागपूरला उतरविले
शनिवारी सकाळी १० वाजता जयकुमार गोरे यांचे बेलोरा विमानतळावर आगमन होणार होते. त्यापूर्वी १९ नोव्हेंबर रोजी नागपूर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर ते कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे शासकीय पूजेसाठी गेले होते. तेथून पुणेमार्गे विमानाने अमरावतीला येण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र, बेलोरा परिसरातील प्रतिकूल हवामानामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसी) विमान उतरविण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे विमान नागपूरला उतरविण्यात आले.
उशिराने पोहोचल्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी
पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६’ अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मंत्री गोरे तब्बल चार तास विलंबाने पोहोचले. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी उशिराने उपस्थित राहिल्याबद्दल व्यासपीठावरून उपस्थितांची दिलगिरी व्यक्त केली.
‘माझ्या आकड्यावर आक्षेप असेल तर समोर येऊन बोला!’ राऊतांचा गंभीर आरोप
पाचही जिल्ह्यांचे पालकमंत्री अनुपस्थित
विभागीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित राहणार असल्याचा उल्लेख निमंत्रणपत्रिकेत करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात एकही पालकमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही. याबाबत स्पष्टीकरण देताना मंत्री गोरे म्हणाले की, शासकीय प्रोटोकॉलनुसार सर्व पालकमंत्र्यांना निमंत्रित करणे आवश्यक असते. मात्र, पूर्वनियोजित कामे आणि महत्त्वाच्या बैठकांमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.








