सर्व स्तरातून माजी सरपंचांना पुन्हा संधी देण्याची मागणी वाढली
Gadchiroli : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार सध्या प्रशासकांच्या माध्यमातून सुरू असून, या प्रशासकराजाचा परिणाम आता केवळ प्रशासकीय कामकाजापुरता मर्यादित राहिलेला नाही. गावपातळीवरील विकासकामे, नागरिकांची दैनंदिन कामे आणि स्थानिक राजकीय समीकरणांवरही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. एका प्रशासकाकडे तब्बल आठ ते दहा ग्रामपंचायतींचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आल्याने गावगाड्याचा वेग मंदावल्याची तक्रार पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर मागील पंचवार्षिकमध्ये सरपंचपद भूषविलेल्या अनुभवी व्यक्तींना पुन्हा प्रशासक म्हणून संधी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच संघटनेने केली आहे. त्यामुळे प्रशासक नियुक्तीचा मुद्दा आता जिल्ह्यातील स्थानिक राजकारणातही चर्चेचा विषय बनला आहे.
ग्रामपंचायत ही ग्रामीण प्रशासनाची महत्त्वाची कडी मानली जाते. जन्म-मृत्यू दाखले, रहिवासी दाखले, विविध शासकीय योजनांशी संबंधित कागदपत्रे तसेच गावातील मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नागरिकांना ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा लागतो. मात्र, एकाच प्रशासकाकडे अनेक ग्रामपंचायतींची जबाबदारी असल्याने प्रत्येक ठिकाणी नियमित उपस्थिती राखणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, दाखल्यांसाठी ग्रामस्थांना वारंवार ग्रामपंचायतींचे उंबरठे झिजवावे लागत असून, प्रशासकीय कामांचा खोळंबा होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसल्याने गावपातळीवरील निर्णयप्रक्रियेतही बदल झाला आहे. स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी पूर्वी सरपंचांची महत्त्वाची भूमिका होती. आता प्रशासकांकडे अनेक गावांचा कारभार असल्याने स्थानिक पातळीवरील समन्वयाचा प्रश्न निर्माण होत आहे. याचा परिणाम ग्रामीण विकासाच्या कामांवर आणि स्थानिक नेतृत्वाच्या राजकीय सक्रियतेवरही होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासक नियुक्तीच्या पद्धतीत बदल करण्याची अपेक्षा स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.
मागील पंचवार्षिकमध्ये सरपंच म्हणून काम केलेल्या व्यक्तींना गावातील समस्या, स्थानिक परिस्थिती, ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज आणि विकासकामांचा अनुभव असतो. त्यामुळे अशा व्यक्तींना प्रशासकपदाची जबाबदारी दिल्यास ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक गतिमान होऊ शकते, असा दावा सरपंच संघटनेने केला आहे. नागरिकांची कामे वेळेत होण्यासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
माजी सरपंचांना पुन्हा प्रशासकीय जबाबदारी देण्याची मागणी साखरा येथील माजी सरपंच तथा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पुण्यवान सोरते, कनेरीचे माजी सरपंच व जिल्हा संघटक तुषार मडावी, राजगाटा चकचे माजी सरपंच यशवंत काळबांधे, देवापूरचे सरपंच शिवाजी गावडे, नवेगावचे सरपंच दशरथ चांदेकर, गोगावचे माजी सरपंच राजू उंदीरवाडे, बोदलीचे माजी सरपंच आकाश निकोडे आणि राजगाटा चकचे ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक येवले यांनी केली आहे.
एकीकडे प्रशासकीय यंत्रणेवरील अतिरिक्त कामाचा ताण, तर दुसरीकडे गावपातळीवरील नेतृत्वाला पुन्हा संधी देण्याची मागणी, अशा दुहेरी पेचात ग्रामपंचायतींचा कारभार सापडला आहे. आगामी काळात शासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सरपंच संघटनांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे. प्रशासकराज कायम राहणार की अनुभवी माजी सरपंचांना पुन्हा गावकारभाराची सूत्रे मिळणार, यावर गडचिरोलीतील ग्रामीण राजकारणाची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.








