व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण शरद पवारांची राष्ट्रवादी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार?

शरद पवारांची राष्ट्रवादी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार?

बहुतांश जिल्हाध्यक्षांचा सकारात्मक कल; मुंबईतील बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

Mumbai : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून देशातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाची 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, बैठकीत सहभागी झालेल्या बहुतांश जिल्हाध्यक्षांनी विधेयकाच्या बाजूने आपला कल व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये गेल्या काही वर्षांत लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मतदारसंघांची पुनर्रचना करणे आवश्यक असल्याचे मत काही जिल्हाध्यक्षांनी मांडल्याचे समजते. मतदारसंघांची व्याप्ती आणि मतदारसंख्येतील असमतोल लक्षात घेता पुनर्रचनेचा विचार व्हायला हवा, अशी भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली.

मात्र, बहुतांश जिल्हाध्यक्षांचा कल सकारात्मक असला तरी पक्षाकडून अद्याप अधिकृत समर्थन जाहीर करण्यात आलेले नाही. या विधेयकातील तरतुदी, त्याचा महाराष्ट्रासह विविध राज्यांवर होणारा परिणाम आणि राजकीय प्रतिनिधित्वावर पडणारे संभाव्य परिणाम यांचा अभ्यास केल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्याचे पक्षाने निश्चित केल्याचे सांगितले जाते.

दुष्काळानंतर जाग आली; कायमस्वरूपी उपायांसाठी ‘पूल तिथे बंधारा’!

केंद्र सरकारकडून महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. 27 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, या बैठकीत विधेयकाच्या मसुद्यातील बदलांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 30 नोव्हेंबरला लोकसभा आणि 2 डिसेंबरला राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू होणार आहे.

प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकानुसार लोकसभेतील सदस्यसंख्या 543 वरून कमाल 850 पर्यंत नेण्याची तरतूद आहे. यामध्ये राज्यांसाठी 815 आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 35 जागांची मर्यादा प्रस्तावित आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी एकतृतीयांश जागा आरक्षित करण्याच्या तरतुदीशी या पुनर्रचनेचा संबंध जोडण्यात आला आहे. 2027 च्या जनगणनेची प्रतीक्षा न करता 2011 च्या जनगणनेच्या आधारे पुनर्रचना करण्याची तरतूदही प्रस्तावित मसुद्यात आहे.

दरम्यान, या विधेयकावरून विरोधी पक्षांकडून राज्यांचे प्रतिनिधित्व, लोकसंख्येच्या आधारे जागांचे वाटप आणि संघराज्य व्यवस्थेवरील संभाव्य परिणाम याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका काय असेल, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

१५ डिसेंबरपूर्वी संसदेचे अधिवेशन? पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश!

पक्षाच्या बैठकीत जिल्हाध्यक्षांनी मांडलेली मते आणि वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली सावध भूमिका पाहता, विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पक्षाकडून सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या विधेयकाबाबत नेमकी कोणती भूमिका मांडतात, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!