‘तीन वर्षे दोन्ही राष्ट्रवादींनी भांडणाचे नाटक केले, जुन्या फेसबुक पोस्टचा दिला दाखला
Mumbai: मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पवारांवर टीका केली जात आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या घडामोडींवर मार्मिक टिप्पणी करत शरद पवारांच्या राजकारणावर निशाणा साधला आहे. ‘हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं,’ असे म्हणत त्यांनी जुन्या राजकीय घटनांचा संदर्भ दिला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये २ जुलै २०२३ रोजी केलेल्या विधानाची आठवण करून दिली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांचा गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला होता. त्या घटनेचा संदर्भ देताना राज ठाकरे म्हणाले की, त्यावेळी राष्ट्रवादीची एक टीम भाजपच्या दिशेने गेली होती. त्यानंतर पुढील तीन वर्षे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकमेकांविरोधात भांडण सुरू असल्याचे चित्र निर्माण केले. मात्र, आता सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीमदेखील त्याच दिशेने निघाल्याचे दिसत असल्याची टिप्पणी त्यांनी केली.
राज ठाकरे यांनी आपल्या जुन्या पोस्टमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची तुलना ‘सिंहासन’ चित्रपटातील शेवटच्या दृश्याशी केली होती. उद्धव ठाकरे यांचे राजकीय ओझे शरद पवारांना उतरवायचे होते आणि त्याचा पहिला अंक पार पडला, असे त्यांनी म्हटले होते. राष्ट्रवादीची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली असून दुसरी टीमही कालांतराने सत्तेच्या सोपानासाठी सहभागी होईल, असा सूचक उल्लेख त्यांनी केला होता. आता डिलिमिटेशन विधेयकाच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा त्याच विधानाचा संदर्भ दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर पक्षाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबतही तर्कवितर्क सुरू झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना पक्षाचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा असल्याचे सांगितले होते. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला. राष्ट्रवादीचे आठ खासदार, इंडिया आघाडीतील पक्षांची भूमिका आणि भाजपसोबतच्या संभाव्य राजकीय समीकरणांमुळे या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सत्ता हेच अंतिम ध्येय; विजय वडेट्टीवारांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर घणाघात
एकीकडे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून या भूमिकेवर आक्षेप घेतला जात असताना, दुसरीकडे राज ठाकरे यांनी जुन्या राजकीय घटनांचा दाखला देत पवारांच्या राजकीय रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकाचा मुद्दा आता केवळ संसदेपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
___








