Kejriwal’s name is an obstacle in the country’s progress : काँग्रेसच्या मायाजालातून मुस्लीम बांधव मुक्त होणे गरजेचे
Nagpur : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने २०१५ आणि २०२० या दोन निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा बहुमताने सत्ता मिळवली. अरविंद केजरीवाल नावाचा अडसर असल्यामुळे गेली १० वर्षे देशाच्या प्रगतीमध्ये खोडा निर्माण झाला होता. पण आता हा अडसर दूर झालेला आहे, असे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
नागपूर विमानतळावर आज (८ फेब्रुवारी) पत्रकारांशी बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, देशाच्या विकासामध्ये केजरीवाल नावाचा जो अडसर होता, तो आता दूर झालेला आहे. दिल्ली ही देशाची राजधानी आहे. देशाच्या राजधानीमध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय पर्यंटक येतात, आंतरराष्ट्रीय नेतृत्व येतं. तेव्हा केजरीवाल अडसर ठरायचे. आता देशात भाजप सत्तेत आहे आणि दिल्लीतही भाजप सत्तेवर येणार आहे. दिल्लीच्या विकासासाठी डबल इंजीन सरकार एकत्र मिळून काम करणार आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीचा वेग निश्चितपणे वाढणार आहे.
जैसा कर्म करेगा, वैसा फल देगा मतदार..
दिल्लीमध्ये काँग्रेसचा पार धुव्वा उडाला आहे. याबाबतीत विचारले असता, ‘जैसा कर्म करेगा, वैसा फल देगा मतदार..’, असं आमदार मुनगंटीवार म्हणाले. कारण काँग्रेस आपल्या अपयशाचे खापर कधी निवडणूक आयोगावर, कधी ईव्हीएमवर, तर कधी सुप्रीम कोर्टावर फोडते. सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करते. केवळ टिका करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असतो. हा प्रयत्न नेहमी नेहमी यशस्वी होत नाही, असंही ते म्हणाले.
त्यांचं खटाखट चालतं का?
राहुल गांधींच्या भाषणात नेहमी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख माफीवीर सावरकर असा केला जातो. सातत्याने अदानी, अंबानी यांनी नावे घेतली जातात. देशाच्या विकासाच्या बाबतीत काहीही ते बोलत नाहीत. आम्ही लाडक्या बहीणींना १५०० रुपये दिले तर यांचं पोट दुखतं. त्यांच्या पोटदुखीवर अॅलोपॅथी, होमिओपॅथी कोणतीही औषधी लागू पडत नाही. त्यांनी खटाखट खटाखट ८५०० रुपये देण्याची घोषणा केली तर चालतं. पण आमचे १५०० रुपये त्यांना खटकतात. हा दुटप्पीपणा आहे, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले.
Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे आणखी एक फलीत
जातीचे राजकारण चालणार नाही..
आता काँग्रेसने आणि एकंदरीतच इंडिया आघाडीने जातीचे नवीन राजकारण सुरू केले आहे. आपण २१ व्या शतकात आहोत. २१ व्या शतकात हे राजकारण करायला नको. आता फक्त विकासाची कास धरायला हवी. जातीचे राजकारण करण्याची राहुल गांधींची भूमिका चुकीची आहे. विचारवंत असं म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकल्यानंतर आम्ही भाजपला मत देण्याचा विचार करतो. आणि राहुल गांधींचे भाषण ऐकल्यावर भाजपलाच मत देतो. यावरून काय ते समजून घ्यावे, असेही ते म्हणाले.
९ कोटी मुस्लीम बहीणींना न्याय दिला..
मुस्लीमबहुल भागातही भाजप आघाडीवर आहे, याबाबत विचारले असता आमदार मुनगंटीवार म्हणाले की, ‘सबका साथ – सबका विकास’चे हे यश आहे. मोदींनी सांगीतले आहे की, आम्ही कोण्या धर्माच्या विरोधात नाही. आम्ही कोणत्याही धर्माचा अवमान करणार नाही. प्रत्येक धर्माची आपआपली गरीमा असते, ती आम्ही पाळतो. तीन तलाखच्या अत्याचारातून ९ कोटी मुस्लीम बहीणींना न्याय देणारा शेरदील नेता म्हणजे नरेंद्र मोदी आहेत.
Sudhir Mungantiwar : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या ऐतिहासिक कार्याची पुन्हा होतेय आठवण !
झाडू त्यांना साफ करणारच होता..
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आधीच सांगीतलं होतं की, त्यांचा झाडू त्यांनाच साफ करणार आहे. ते आज खरं ठरलं आहे. कारण नसताना मुस्लीम बांधवांमध्ये भीती निर्माण केली गेली. काँग्रेसच्या मायाजालातून मुस्लीम बांधव मुक्त होणे गरजेचे आहे. ‘हिंदू मुस्लीम सीख ईसाई – बांटने का काम करते आयी काँग्रेस आई’ असं जे म्हणतात, ते काही खोटं नाही, असे म्हणत आमदार मुनगंटीवार यांनी काँग्रेस नेत्यांना सणसणीत टोला लगावला.