abijeet-dipke-visit-latur-zp-school-dada-bhuse-resignation-demand : जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था; राजीनाम्याची मागणी
Mumbai : लातूर जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर या परिस्थितीची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित करत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर दिपके यांनी शिक्षण व्यवस्थेच्या स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या अभिजीत दिपके यांनी उजनी येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली. यावेळी शाळेच्या इमारतीची झालेली अवस्था, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा आणि रखडलेली विकासकामे याबाबत ग्रामस्थांकडून माहिती घेतली. शाळेच्या इमारतीवर पत्रे असून त्यातून पावसाळ्यात पाणी गळत असल्याचे तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेसे बाक नसल्याचे ग्रामस्थांनी दिपके यांच्या निदर्शनास आणून दिले.
Nagpur municipal corporation: भाजपचे शिक्षण सभापती हिंदीतून बोलायला लागले, काँग्रेस नगरसेवकाने टोकले
शाळेच्या संरक्षक भिंतीसह स्वच्छतागृहासाठी निधी मंजूर होऊनही मागील पाच वर्षांपासून संबंधित कामे सुरू झालेली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यानंतर अभिजीत दिपके यांनी उजनीच्या ग्रामसेवकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत मंजूर निधी आणि रखडलेल्या कामांबाबत विचारणा केली. यावेळी ग्रामसेवकांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप दिपके यांनी केला. शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगले शैक्षणिक वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यातही प्रशासन अपयशी ठरत असेल, तर याची जबाबदारी संबंधित विभागाने स्वीकारली पाहिजे, असे दिपके यांनी म्हटले.
शिक्षणमंत्र्यांनी आधी स्वतःच्या मुलांना सरकारी शाळेत पाठवावे, असा खोचक टोला अभिजीत दिपके यांनी लगावला. शिक्षणमंत्री आणि आमदारांनी आपल्या मुलांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळांमध्ये करून घेतले, तर या शाळांमधील परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासनावर अधिक प्रभावी दबाव निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. “दहा वर्षांत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक आणि शाळेला आवश्यक सुविधा देता येत नसतील, तर प्रशासनाने नेमके केले काय?” असा सवाल उपस्थित करत दिपके यांनी दादा भुसे यांनी शिक्षणमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
FDA : सुटे खाद्यतेल विकले तर कारवाई अटळ; तुकाराम मुंढेंचा विक्रेत्यांना थेट इशारा
औसा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या पाहणीदरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आल्याचा दावा दिपके यांनी केला. खासगी शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनीही याबाबत माहिती दिल्याचा दावा करण्यात आला. ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून सरकारी शाळांमधील प्रत्यक्ष परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संबंधित अधिकारी आणि प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही शाळेतील समस्या सुटत नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला नाही, तर अधिकारी अधिक बेफिकीर आणि मुजोर होत जातात, अशी प्रतिक्रिया अभिजीत दिपके यांनी दिली. लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित इमारत, स्वच्छतागृह, बसण्यासाठी बाक, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी या पाहणीदरम्यान करण्यात आली.








