ashok-kharat-case-sit-charge-sheet-1200-pages-witness-statements-nashik-news : अशोक खरातविरोधात 1200 पानांचे दोषारोपपत्र, 105 साक्षीदारांचे जबाब
Nashik : नाशिकमधील कथित भोंदू अशोक खरात याच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि दैवी शक्तीच्या नावाखाली भाविकांची फसवणूक केल्याच्या आरोपांप्रकरणी विशेष तपास पथकाने न्यायालयात तब्बल 1200 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात सलग 49 दिवस चौकशी करत एसआयटीने 105 साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून तपासादरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अशोक खरातविरोधात दाखल करण्यात आलेल्या एकूण गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटीमार्फत सुरू आहे. त्यापैकी महिला अत्याचाराशी संबंधित दोन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. एका गुन्ह्यात सुमारे 750 पानांचे तर दुसऱ्या गुन्ह्यात जवळपास 450 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून एकूण कागदपत्रांची संख्या 1200 पानांपर्यंत पोहोचली आहे. उर्वरित प्रकरणांमध्येही लवकरच दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
विशेष तपास पथकाने सलग 49 दिवस अशोक खरातची कसून चौकशी केली. या काळात त्याच्या निवासस्थानी, कार्यालयात आणि फार्महाऊसवर छापेमारी करून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि इतर संवेदनशील पुरावे तपास यंत्रणेकडे जमा करण्यात आले आहेत. साक्षीदारांच्या जबाबातून तपासाला मोठी दिशा मिळाल्याचे सांगितले जात आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, ईशानेश्वर मंदिर परिसरात अशोक खरात स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करत होता. भाविकांच्या कुटुंबावर मृत्यूचे संकट असल्याची भीती दाखवत तो खडे, चिंचुके आणि रुद्राक्ष देऊन विशेष पूजा करण्याचे सांगत लाखो रुपयांची उकळपट्टी करत असल्याचा आरोप आहे. याशिवाय काही महिलांना बदनामीची धमकी देत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचेही तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात सराफा व्यावसायिक, डॉक्टर आणि इतर अनेक संबंधितांची चौकशी करण्यात आली आहे.
अशोक खरातविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून एकूण 17 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. प्रत्येकी 3 गुन्ह्यांचा तपास नाशिक शहर पोलीस आणि अहिल्यानगर पोलीस करत असून उर्वरित 2 गुन्ह्यांचा तपास नाशिक ग्रामीण पोलिसांकडे आहे. 20 मार्च 2026 पासून या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला आहे.
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील या एसआयटी पथकात एकूण 24 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकात 2 पोलीस उपअधीक्षक, 3 पोलीस निरीक्षक, 3 सहायक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. एसआयटीकडे असलेल्या 11 गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहेत. तसेच एक फसवणुकीचा गुन्हा असून दोन प्रकरणांमध्ये अशोक खरातने साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी बनावट गुन्हे दाखल केल्याचाही आरोप तपासात समोर आला आहे.
अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून अंधश्रद्धा, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या या कथित जाळ्याचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








