व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bjp New Team : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल

Bjp New Team : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल

bjp-national-executive-new-team-maharashtra-uttar-pradesh-five-key-points : महाराष्ट्रापासून उत्तर प्रदेशपर्यंत नवी समीकरणं, ५ मोठे मुद्दे

New Delhi : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय कोषाध्यक्ष, राष्ट्रीय सचिव यांसह विविध पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या नव्या संघटनात्मक रचनेत विविध राज्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेशासह अनेक महत्त्वाच्या राज्यांतील नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे तरुण आणि महिला नेत्यांना देण्यात आलेले प्राधान्य तसेच मुस्लिम समाजातील दोन चेहऱ्यांना मिळालेली जबाबदारी यामुळे या नव्या कार्यकारिणीकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वाने पाहिले जात आहे.

भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील पाच नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. विनोद तावडे यांना राष्ट्रीय महामंत्रीपदावर कायम ठेवण्यात आले आहे. तर पियुष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती पवार यांच्यावर राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंघटन मंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली आहे. याशिवाय सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून प्रीती गांधी यांना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील या पाच चेहऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळाल्याने राज्यातील भाजपच्या संघटनात्मक प्रभावाला या नव्या रचनेत महत्त्व देण्यात आल्याचे मानले जात आहे.

Devendra Fadnavis: पतंग उडवा किंवा फुगे… मी महाराष्ट्रातच राहणार! दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

 

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उत्तर प्रदेशातील नेत्यांना मोठे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातून तारिक मन्सूर आणि रेखा वर्मा यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्मृती इराणी आणि हरीश द्विवेदी यांच्यावर राष्ट्रीय महामंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर डॉ. भोला सिंह आणि संगीता यादव यांची राष्ट्रीय मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अमरपाल मौर्य यांच्याकडे ओबीसी मोर्चाची, तर कुंवर बासित अली यांच्याकडे अल्पसंख्याक मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन स्वतः ४६ वर्षांचे आहेत. त्यामुळे त्यांच्या नव्या टीममध्ये तरुण नेतृत्वाला विशेष स्थान देण्यात आल्याचे दिसून येते. नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ४० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सहा सदस्यांना संधी देण्यात आली आहे. ४० ते ४९ वयोगटातील १५ सदस्य, तर ५० ते ५९ वयोगटातील २१ सदस्यांना राष्ट्रीय टीममध्ये स्थान मिळाले आहे. पक्षाच्या पुढील पिढीतील नेतृत्वाला तयार करण्याच्या दृष्टीने हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. संघटनेत अनुभवी नेत्यांसोबत तरुण चेहऱ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या रचनेत दिसून येतो.

Chandrashekhar bawankule : रोहित पवार फक्त भ्रम निर्माण करतात, निवडणूक यंत्रणेवरील टीका संविधानविरोधी

भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महिला नेतृत्वालाही मोठे स्थान देण्यात आले आहे. पक्षाच्या संविधानात संघटनेत ३३ टक्के महिला प्रतिनिधित्वाची तरतूद आहे. नव्या टीममध्ये या तरतुदीला महत्त्व देण्यात आल्याचे दिसत आहे.
भाजपच्या एकूण १३ राष्ट्रीय उपाध्यक्षांपैकी सहा महिला आहेत. म्हणजेच राष्ट्रीय उपाध्यक्षपदांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व जवळपास निम्मे आहे.

याशिवाय स्मृती इराणी यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चार महिलांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या नव्या संघटनात्मक रचनेत महिला नेतृत्वाला विशेष महत्त्व देण्यात आल्याचे स्पष्ट होते.

भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीममधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन मुस्लिम नेत्यांना देण्यात आलेली जबाबदारी. तारिक मन्सूर यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर कुंवर बासित अली यांच्याकडे भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तारिक मन्सूर हे पसमांदा मुस्लिम समाजातून येतात, तर कुंवर बासित अली हे राजपूत मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करतात. दोन्ही नेते उत्तर प्रदेशातील आहेत.

Ramdas Athavale: पेपरफुटीविरोधात लढा देणारे अभिजित दीपके आरपीआयमध्ये येणार? रामदास आठवले यांची ऑफर

उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांना देण्यात आलेली जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे. मुस्लिम समाजातील विविध घटकांपर्यंत पक्षाचा राजकीय संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने भाजपने ही रणनीती आखल्याची चर्चा आहे.

भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे आगामी निवडणुकांच्या रणनीतीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. महाराष्ट्राला मिळालेले महत्त्वाचे प्रतिनिधित्व, उत्तर प्रदेशातील मोठ्या संख्येने झालेल्या नियुक्त्या, तरुण आणि महिला नेतृत्वाला दिलेले प्राधान्य तसेच मुस्लिम समाजातील नेत्यांना दिलेली जबाबदारी हे या नव्या रचनेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे.

त्यामुळे नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली भाजपची नवी राष्ट्रीय टीम आगामी काळातील निवडणुकांसाठी संघटनात्मक पातळीवर किती प्रभावी ठरते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

__

error: Content is protected !!