आरोपांमुळे पक्षात प्रचंड असंतोष; संजय थूल यांची अपक्ष उमेदवारी
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून बहुजन समाज पक्षाने (बसपा) ऐनवेळी माघार घेतल्याने पक्षात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेले दावेदार संजय थूल यांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरीचा झेंडा उभारला आहे. उमेदवाराला महिनोनमहिने कामाला लावायचे, पक्षाचा प्रचार करायला लावायचा आणि ऐन फॉर्म भरण्याच्या दिवशी ‘एबी फॉर्म’ नाकारून माघार घ्यायची, या बसपाच्या धक्कादायक कार्यपद्धतीमुळे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नसून २०२० च्या पदवीधर निवडणुकीतही असाच प्रकार घडल्याचा दावा तत्कालीन उमेदवार प्रा. प्रशांत डेकाटे यांनी केला आहे.
२०२० मध्ये डेकाटे यांना उमेदवारीचे आश्वासन देऊन प्रचार व मतदार नोंदणी करून घेण्यात आली होती, मात्र शेवटच्या क्षणी त्यांना एबी फॉर्म नाकारण्यात आला. आता २०२६ च्या निवडणुकीत सेवानिवृत्त अधिकारी संजय थूल यांच्याबाबतही तोच प्रकार घडल्याने डेकाटे यांनी पक्षाच्या वरिष्ठांवर थेट प्रश्नांची सरबत्ती केली आहे. जर निवडणूक लढवायचीच नव्हती, तर उमेदवाराकडून वेळ, पैसा आणि श्रम खर्च करून का घेतले, अंतिम क्षणी माघार घेणे ही कोणती राजकीय रणनीती आहे, या निर्णयामागे काही आर्थिक किंवा राजकीय सौदेबाजी झाली आहे असा थेट सवाल प्रा. डेकाटे यांनी उपस्थित केला आहे.
आपला वैयक्तिक अनुभव सांगताना प्रा. डेकाटे यांनी अत्यंत खळबळजनक खुलासा केला. २०२० च्या निवडणुकीदरम्यान तत्कालीन प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले होते. परंतु, सुश्री बहीण मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त २५ लाख रुपयांचा पक्षनिधी द्या, तरच एबी फॉर्म मिळेल, अशी मागणी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याचा आरोप डेकाटे यांनी केला आहे.
अभिनंदन गडचिरोली! मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी खास कारणासाठी केले कौतुक
संजय थूल यांनी निवृत्तीनंतर पदवीधर मतदारांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली होती. हजारो फॉर्म भरून घेतले, शहरात कटआऊट्स लावले, रॅली काढल्या आणि मोठा वैयक्तिक खर्च केला. मात्र, पक्षाने ऐनवेळी पाठ फिरवल्याने त्यांच्या श्रमाचा आणि राजकीय विश्वासाचा चुराडा झाला आहे. सतत दुसऱ्यांदा हे घडले आहे. यामागे कोणती पडद्यामागील सूत्रे हलतात, या प्रश्नावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.








