‘स्टील सिटी’ म्हणून विकसित करण्याचा दृढ संकल्प
Nagpur केंद्र सरकारच्या नीती आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या तिमाही डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने अभूतपूर्व कामगिरी करत संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील संपूर्ण प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, उद्योजक आणि नागरिकांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील सिटी’ म्हणून विकसित करण्याचा दृढ संकल्पही त्यांनी जाहीर केला आहे.
संपूर्ण देशभरात आकांक्षित जिल्ह्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांतर्गत नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय व सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी दर तिमाहीला हे रँकिंग दिले जाते. एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीच्या मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला असून, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
विशेषतः शेती आणि जलसंधारणाच्या क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्याने ही सर्वोत्तम बाजी मारली आहे. ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ यांतर्गत जिल्ह्यात तब्बल ६,००० नवीन जलसाठे तयार करण्यात आले. याशिवाय सर्व शाळांमध्ये मुलींसाठी प्रसाधनगृहांची संख्या वाढवून स्वच्छतेवर भर देण्यात आला, बँक खात्यांच्या आधार प्रमाणीकरणाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आणि आयटीआय मध्ये महिंद्रा, लॉईड्स व टाटा ट्रस्ट यांसारख्या नामवंत संस्थांच्या सहकार्याने नवीन कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण आणि गरोदर महिलांना सकस आहार पुरवण्याच्या क्षेत्रातही प्रशासनाने उत्तम काम हाती घेतले.
या यशाचा गौरव करताना मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच हे यश शक्य झाले असून, आपल्या सर्वांच्या साथीने आपण विकासाचा प्रत्येक टप्पा असाच पार करू, असा मला पूर्ण विश्वास आहे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. गडचिरोलीची ओळख बदलून त्याला आगामी काळात देशातील प्रमुख स्टील सिटी बनवण्याचा संकल्पही त्यांनी या निमित्ताने पुन्हा केला.








