chandrapur-bjp-conflict-kishor-jorgewar-ravindra-chavan-delhi-decision : आता थेट दिल्ली दरबारात होणार अंतिम निर्णय
Chandrapur : चंद्रपूर येथे भारतीय जनता पक्षातील अंतर्गत संघर्षाने आता उग्र रूप धारण केले असून आमदार किशोर जोरगेवार आणि पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमधील वाद नियंत्रणाबाहेर गेला आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही या प्रकरणात आपली हतबलता व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर येथे झालेल्या बैठकीत रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, चंद्रपूरमधील वाद त्यांच्या आटोक्याबाहेर गेला असून आता यावर अंतिम निर्णय थेट दिल्लीतून घेतला जाईल. राज्यातील कोणताही वरिष्ठ नेता या वादात हस्तक्षेप करण्यास तयार नसल्याचे चित्र निर्माण झाले असून त्यामुळे पक्षांतर्गत तणाव अधिकच वाढला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका झोन समिती आणि महिला बालकल्याण समिती निवडणुकांमध्ये भाजपला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. संख्याबळ असतानाही अंतर्गत गटबाजीमुळे सत्ता गमवावी लागल्याने पक्षात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर किशोर जोरगेवार यांनी आपल्या समर्थक १७ नगरसेवकांसह नागपूरमध्ये जाऊन प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली. मात्र या भेटीतूनही कोणताही तोडगा निघाला नाही, उलट प्रदेश नेतृत्वानेच हात वर केल्याची चर्चा रंगली आहे.
या संपूर्ण संघर्षाच्या केंद्रस्थानी माजी मंत्री व ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा निष्ठावान आणि जुन्या कार्यकर्त्यांचा गट आणि जोरगेवार यांच्यातील वाढता संघर्ष असल्याचे मानले जात आहे. राज्यातील अनेक नेते या वादात उघडपणे भूमिका घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहे. परिणामी पक्षातील निर्णयप्रक्रिया ठप्प झाल्याचे चित्र आहे.
Girish mahajan : बुलढाणा भाजपच्या कलहात गिरीश महाजनांची एन्ट्री?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले मदन येरावार यांनीही या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपला राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती इतकी तणावपूर्ण आहे की, कोणताही नेता प्रत्यक्ष चंद्रपूरमध्ये जाऊन मध्यस्थी करण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे.
जोरगेवार यांच्यावर यापूर्वीच पक्षांतर्गत प्रक्रियेत हस्तक्षेप, एबी फॉर्म संदर्भातील वाद आणि महापालिकेतील निवडणुकांमध्ये पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे आरोप झाले आहेत. या सर्व घटनांमुळे शिस्तप्रिय मानल्या जाणाऱ्या भाजपमध्येच काँग्रेससारखी गटबाजी आणि अंतर्गत संघर्ष उफाळून आल्याची टीका होत आहे.
Legislative Council election : विधान परिषदेसाठी पडद्यामागची खेळी; बुलढाण्यात राजकीय तापमान वाढले
चंद्रपूरमधील हा संघर्ष केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचला असून पक्षाच्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसत आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असून नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येत्या काळात दिल्लीतून होणारा निर्णय हा केवळ चंद्रपूरसाठीच नव्हे, तर राज्यातील भाजपच्या अंतर्गत राजकारणासाठीही निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
___








