Maharashtra governments big decision after poisonous cough syrup case: विषारी कफ सिरप प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारचा निर्णय
Mumbai : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे चिमुकल्यांच्या मृत्यूच्या धक्कादायक घटनांनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आता महाराष्ट्र सरकारने बालआरोग्याच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने तात्काळ पावले उचलत एक टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक सुरू केला असून, संशयित औषधांची माहिती नागरिकांनी या क्रमांकावर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ‘कोल्ड्रिफ कफ सिरप’ हे औषध मे 2025 ते एप्रिल 2017 या कालावधीत तयार झालेले कोणत्याही मेडिकलमध्ये असल्यास, त्या साठ्याची तात्काळ माहिती टोल फ्री क्रमांकावर द्यावी. या औषधाच्या बॅच क्रमांक SR-13 मध्ये विषारी घटक डायइथिलीन ग्लायकोल आढळल्याने त्याच्या विक्री, वितरण आणि वापरावर तातडीने बंदी घालण्यात आली आहे.
Government Schemes: गाजावाजा करुन सुरु केलेली आणखी एक योजना वांद्यात!
तपासणीत असे समोर आले की, कोल्ड्रिफ सिरपमध्ये 48.6% डायइथिलीन ग्लायकोलचे प्रमाण आढळले, जे परवानगी असलेल्या 0.1% मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. हा रासायनिक घटक अत्यंत विषारी असून, तो शरीरात गेल्यानंतर मूत्रपिंड निकामी होणे, तीव्र उलट्या आणि मेंदूवर परिणाम अशा गंभीर लक्षणांना कारणीभूत ठरतो.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात या विषारी सिरपमुळे आतापर्यंत 14 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे, तर राजस्थानमध्येही 3 मुलांचा बळी गेला आहे. कफ सिरप पिल्यानंतर या मुलांमध्ये तीव्र आजाराची लक्षणं दिसली, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तपासानुसार, सर्व मृत मुलांना एकाच प्रकारचा ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरप देण्यात आला होता.
या घटनेनंतर मध्य प्रदेश सरकारने संबंधित औषधावर तात्काळ बंदी घातली असून, उत्पादक कंपनीच्या कांचीपुरम येथील युनिटवर छापेमारी करण्यात आली आहे. तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचे निर्देश दिले असून, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि केरळ सरकारांनीही ‘कोल्ड्रिफ’ सिरपच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे.
Flood-Affected Farmers : शासन निष्क्रीय, शेतकऱ्यांबद्दल उदासीन, काँग्रेसची टीका
नागपूरसह राज्यभरातील अन्न व औषध प्रशासन अधिकारी अलर्ट मोडवर असून, औषधांच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या चाचण्यांद्वारे मृत्यूंच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे बालऔषधांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, राज्य सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि औषध विक्रेत्यांनी निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
विषारी कफ सिरपच्या या प्रकरणाने केवळ औषध निर्मिती क्षेत्रालाच नव्हे, तर प्रशासनालाही जागे केले असून, लहान बालकांच्या आरोग्यसुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने वेळीच घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरत आहे.
_____








