After the entry of Dada Bhuse, political activity within Mahayuti gathers pace in Buldhana: दादा भुसेंची एंट्रीनंतर बुलढाण्यात महायुतीमधील हालचाली वेगवान
Buldhana जिल्ह्याच्या राजकारणात सध्या महायुतीतील अंतर्गत समीकरणे वेगाने बदलताना दिसत असून, त्यातच शिंदे सेनेकडून दादा भुसे यांची संपर्कमंत्री म्हणून झालेली एंट्री अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे. देऊळगाव राजा येथे अलीकडेच घडलेल्या ‘घरच्याघरी’ वादामुळे पक्षातील विसंवाद उघडपणे समोर आला असताना, हा निर्णय केवळ संघटनात्मक बदल नसून ‘डॅमेज कंट्रोल’चा भाग असल्याची चर्चा रंगली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत संघटन मजबूत करण्याचे निर्देश दिल्यानंतर लगेचच जिल्हा संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर भुसे यांची बुलढाण्यात नियुक्ती करण्यात आली. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव, गटबाजी आणि स्थानिक स्तरावरील मतभेद यामुळे संघटनात्मक अडचणी निर्माण झाल्याचे चित्र अलीकडील घटनांमधून स्पष्ट झाले होते.
Sand Mafia : नांदुरा येथे रेतीमाफीयांची मुजोरी, तहसीलदारांवर कॅबीनमध्ये शिरून प्राणघातक हल्ला
दरम्यान, भाजपनेही दोन दिवसांपूर्वी जयंत डेहनकर यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करत स्वतंत्रपणे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे महायुतीत दोन्ही पक्षांकडून ‘जिल्हा ताब्यात’ घेण्याची चढाओढ सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. एकीकडे भाजपचा संघटनात्मक प्रयोग, तर दुसरीकडे शिंदे सेनेचा संपर्कमंत्र्यांद्वारे हस्तक्षेप – या दुहेरी हालचालींमुळे बुलढाण्यातील राजकारण अधिकच रंगतदार बनले आहे.
Water shortage : आठ महिन्यांपासून पाणीच मिळाले नाही, संतप्त महिलांचा अभियंत्याच्या कक्षात ठिय्या
दादा भुसे यांची कार्यशैली मवाळ असली तरी संघटनावर मजबूत पकड ठेवण्याची त्यांची क्षमता ओळखली जाते. त्यामुळे पक्षातील नाराजी दूर करत सर्वांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असेल. विशेषतः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वय राखणे अत्यावश्यक असताना, भुसे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
सध्या तरी ही नियुक्ती अंतर्गत वाद शमवण्यासाठी आहे की आगामी निवडणुकांसाठी ‘ग्राउंड सेटिंग’चा भाग, याबाबत स्पष्टता नसली तरी एक गोष्ट निश्चित आहे की बुलढाण्याच्या राजकारणात आता दादा भुसे यांची एंट्री झाली असून, त्याचा परिणाम येत्या काळात दिसून येणार आहे.








