girish-mahajan-on-manoj-jarange-patil-maratha-reservation-demands : जरांगे पाटलांच्या मागण्यांवर गिरीश महाजन स्पष्टच बोलले, म्हणाले…
Mumbai : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज चौदावा दिवस असून, त्यांनी आता मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिला आहे. आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारने अनेक वेळा सकारात्मक भूमिका घेतली असून, सरकारचे शिष्टमंडळ वेळोवेळी त्यांची भेट घेत असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यांच्या एकूण १४ मागण्यांपैकी १२ मागण्या सरकारने सनदशीर मार्गाने मान्य केल्याचा दावा त्यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण, शैक्षणिक सवलती तसेच ओबीसी समाजाप्रमाणे विविध लाभ देण्यासाठी सरकारने निर्णय घेतले आहेत, असेही महाजन म्हणाले.
New Point System : नियम तोडाल तर फक्त चलान नाही, थेट परवान्यावर गदा!
मात्र, न्यायालयाच्या आदेशाच्या चौकटीबाहेर जाऊन काही मागण्या पूर्ण करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘सगेसोयरे’च्या प्रश्नासह जात पडताळणी समिती रद्द करण्यासारख्या मागण्या कायदेशीर प्रक्रियेच्या बाहेर असल्याने त्या कशा मान्य करायच्या, असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. प्रत्येक वेळी आंदोलनादरम्यान नव्या मागण्या पुढे येणे योग्य नसून, मागण्यांनाही कुठेतरी मर्यादा असली पाहिजे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविषयी वापरल्या जाणाऱ्या भाषेवरही महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. उच्चपदस्थ व्यक्तींना जाहीरपणे शिवीगाळ करून कोणताही तोडगा निघणार नाही. चर्चेतून आणि सनदशीर मार्गानेच या प्रश्नावर तोडगा काढता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यांवरही महाजन यांनी टीका केली. प्रसिद्धीसाठी काहीही बोलण्याची त्यांची जुनी सवय असल्याचे म्हणत, त्यांच्या वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नसल्याचे महाजन म्हणाले. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावर बोलताना त्यांनी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप फेटाळला. पैशांच्या हव्यासापोटी काही लोकांनी गैरप्रकार केल्याचे सांगत, संबंधित आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांचा संताप स्वाभाविक असून, परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.








