व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Harshwardhan Sapkal : भाजपा सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही, पेपरफुटीचे रॅकेटला...

Harshwardhan Sapkal : भाजपा सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही, पेपरफुटीचे रॅकेटला कुणाचा वरदहस्त?

Harshwardhan sapkal attacks maharashtra govenrment on paper leak cases : हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याची टीका

Mumbai देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीचेच भविष्य अंधारात लोटण्याचे महापाप भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीचे ग्रहण लागले आहे, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप सरकारवर हल्लाबो चढवला.

नीट पेपरफुटीनंतर राज्यात टीईटीचा पेपर फुटला आणि आता MPSC च्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच WhatsApp वर फिरल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. भाजपा सरकारला एक परीक्षाही व्यवस्थित घेता येत नाही, पेपरफुटीने लाखो विद्यार्थी व पालकांच्या आशा आकांशावर बुलडोझर फिरवला जात असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असलेला हा खेळ थांबला नाही तर भाजपाला महागात पडेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

भाजपा सरकारवर तोफ डागत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पेपरफुटीने पाणी फेरले आहे. सरकार व सरकारी यंत्रणा मात्र टोलवाटोलवी करत आहे. यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयाचे गांभिर्य राहिलेले नाही. पेपरफुटी, निकालातील घोटाळे, गुणांतील गैरव्यवहार आणि अधिकृत तक्रारींसह पुरावे समोर आले तरीही सरकार आणि यंत्रणा शांतच आहेत. टीईटी निकालातील गडबड समोर येऊनही सरकारी यंत्रणा मात्र असे काही झालेच नाही असे म्हणत आहे, एमपीएससीकडूनही पेपरफुटीवर गोलमाल स्पष्टीकरण दिले जात आहे, हा तरुणांचा व पालकांवरचा अन्याय आहे.

Aditya thackeray : भाजप राजवटीत परीक्षांचे ‘बूथ कॅप्चरिंग’; आदित्य ठाकरेंचा घणाघाती हल्ला

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण दिले जात आहे, हीच या भ्रष्ट, निष्क्रिय सरकारची कार्यपद्धती आहे, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. पेपरफुटीचे रॅकेट कोणाच्या वरदहस्ताखाली चालू आहे? सरकार मधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने हे उद्योग सुरू आहेत? याची उत्तरे फडणवीस सरकारला द्यावी लागतील. विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी कराल तर हीच तरुणाई तुम्हाला खूर्चीवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

भाजपाच्या चेलेचपाट्यांनी शिक्षण क्षेत्राचा बाजार मांडला आहे. १६० कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात भाजप नेता संजय गरुड ला अटक झाली आहे. यावरून घोटाळेबाज कोण आहेत हे स्पष्ट होते. बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे ८४१ शिक्षक व कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर नोंद करून शासनाची तब्बल १६० कोटींची फसवणूक करण्यात आली असून अटक झालेला आरोपी भाजपाचाच नेता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तरुणाईचे आयुष्य बरबाद केले आहे असेही सपकाळ म्हणाले.

एकीकडे शिक्षण क्षेत्राचा बट्याबोळ केला असून दुसरीकडे उद्योगक्षेत्राचीही वाट लावलेली आहे. महाराष्ट्रातील लघु व मध्यम उद्योगांना टाळे लागले आहे. 2023 ते 2026 या तीन वर्षात महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाचे 28,764 उद्योग बंद झाले आहेत. देशात सर्वात जास्त MSME उद्योग महाराष्ट्रात बंद पडले आहेत. उद्योग बंद होण्यामागे खुल्या बाजारातील आव्हाने, प्रचंड वाढलेला उत्पादन खर्च, वित्तपुरवठ्याच्या अडचणी आणि भ्रष्ट-प्रशासन व गुंडागर्दी ही कारणे आहेत.

Akola Municipal corporation : नाले गाळाने तुडुंब, मग १.०९ कोटींचा खर्च कुठे?; नालेसफाईवरून मनपा प्रशासनावर प्रश्नचिन्ह

उद्योग बंद झाल्यामुळे कोट्यवधी नोकऱ्या आणि रोजगारांवर गदा आली आहे. शिक्षणाचा बाजार, पेपरफुटी यातून सावरले तरी नोकऱ्या मिळतील याची शाश्वती राहिलेली नाही, हे तरुणाईसाठी अत्यंत चिंताजनक असून या सर्वाला भाजपा सरकारचे धोरणच जबाबदार आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!