Corporators’ ‘Goa Vacation’ Comes to an End; Voting for the Legislative Council Election on Thursday : ‘पर्यटन’ नाट्यावर पडदा, भाजपचे डॉ. राजीव पोतदार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत
Nagpur: गोव्याला ‘स्वखर्चाने’ पर्यटनाला गेलेल्या नगरसेवकांची सुटी अखेर संपली असून, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या, गुरुवारी (१८ जून) मतदान होणार आहे. भाजप-महायुतीचे सर्व नगरसेवक मतदानासाठी नागपूरमध्ये दाखल होणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या ‘पर्यटन’ नाट्यावर पडदा पडणार आहे.
नागपूर स्थानिक मतदार संघाच्या या जागेसाठी भाजपचे डॉ. राजीव पोतदार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट आणि चुरशीची लढत होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सुमारे शंभर नगरसेवक अचानक एकाच दिवशी, एकाच ट्रेनने आणि एकाच ठिकाणी गोव्याला रवाना झाले होते. यावर बोलताना भाजप उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांनी आचारसंहिता असल्याने सर्व नगरसेवक स्वेच्छेने पर्यटनाला गेल्याचा दावा केला होता, तसेच त्यांचा निवडणुकीशी काही संबंध नसल्याचे म्हटले होते.
भाजपकडे स्पष्ट बहुमत असून आमचा विजय निश्चित आहे, आम्हाला नगरसेवकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची गरज नाही, असेही पोतदार म्हणाले होते. मात्र, शंभर नगरसेवक एकाच वेळी ‘स्वेच्छेने’ गोव्याला कसे गेले, हे कोडे पोतदार यांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे. आता सर्व नगरसेवक शहरात परतत असल्याने या राजकीय चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
या पोटनिवडणुकीसाठी एकूण ८३६ मतदार आपले लोकप्रतिनिधी निवडणार असून, यामध्ये ४१९ पुरुष तर ४१७ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने एकूण १४ मतदान केंद्र तयार केली आहेत.
यात नरखेड तहसील कार्यालय येथे नरखेड व मोवाड नगरपरिषदेच्या मतदारांना, तर काटोल तहसील कार्यालय येथे काटोल नगरपरिषद व कोंढाळी नगरपंचायतच्या मतदारांना मतदान करता येईल. कळमेश्वर तहसील कार्यालय येथे कळमेश्वर-ब्राह्मणी व मोहपा नगरपरिषदेच्या मतदारांची, तर सावनेर तहसील कार्यालय येथे सावनेर व खापा नगरपरिषदेच्या मतदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. पारशिवनी तहसील कार्यालय येथे पारशिवनी नगरपंचायत, तर कन्हान पिंपरी नगरपरिषद येथे कन्हान पिंपरी व कांद्री नगरपंचायतच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.
तसेच रामटेक तहसील कार्यालय येथे रामटेक नगरपरिषद, मौदा तहसील कार्यालय येथे मौदा नगरपंचायत आणि कामठी तहसील कार्यालय येथे कामठी नगरपरिषद, महादुला, येरखेडा, बीडगाव, गोधणी, बहादुरा-येरखेडा नगरपंचायत व कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी येथील मतदारांना मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूर शहर तहसील कार्यालय येथे नागपूर महानगरपालिकेच्या मतदारांना मतदान करता येईल. याशिवाय वानाडोंगरी नगरपरिषद येथे वानाडोंगरी व वाडी नगरपरिषद, निलडोह, डिगडोह आणि हिंगणा नगरपंचायतच्या मतदारांची व्यवस्था आहे, तर बुटीबोरी नगरपरिषद येथे बुटीबोरी व बेसा-पिंपळा नगरपंचायतच्या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येईल. महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी आपापल्या मतदारांची पूर्ण मोर्चेबांधणी केली असून, उद्या होणाऱ्या या मतदानात नागपूरचा गड कोण राखणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








