Results of 11 municipal councils will determine the future political landscape : काँग्रेस–भाजपची थेट टक्कर, शिवसेना–राष्ट्रवादीच्या गटांनाही कस लागणार
Buldhana बोगस मतदार, मतदानकेंद्रांवरील वाद, शेवटच्या टप्प्यातील अर्थकारण आणि एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे गाजलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपालिकांचा निकाल जिल्ह्यातील आगामी राजकारणाचे दिशानिर्देशक ठरणार आहे. निवडणूक रणधुमाळी शमली असली तरी राजकीय समीकरणांची धग मंगळवारी मतमोजणीपर्यंत कायम राहणार आहे.
२०२२ मधील राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर बुलढाणा जिल्ह्यातही समीकरणे पूर्णपणे बदलली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट, शिवसेनेचे शिंदे व ठाकरे गट आणि भाजप या चार प्रमुख पक्षांनी या निवडणुकीत आपले अस्तित्व व ताकद सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोण किती दमदार? याचे थेट पडसाद या निवडणुकीतून दिसणार आहेत.
Local Body Elections : ‘क्रॉस वोटिंग’ची चलती! निकाल कोणाच्या पारड्यात?
स्वातंत्र्योत्तर काळापासून बुलढाणा काँग्रेसचा गड मानला जातो; मात्र गेल्या काही वर्षांत शहरी मतदारांतील भाजपचा प्रभाव वाढत चालल्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुकीत भाजपची आक्रमक मोहीम, तर काँग्रेसचा संयमी पण ठाम प्रचार — याचा निकालात कोणाला लाभ होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
उद्धवसेना–शिंदेसेना यांनी काही ठिकाणी ‘एकला चलो’चा मार्ग स्वीकारला, तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट भाजपशी थेट लढत देत आहेत. त्यामुळे ११ नगराध्यक्ष आणि २८६ नगरसेवकांपैकी कोण किती जागा जिंकते, यावरच आगामी राजकीय समीकरणांची बीजे रोवली जातील. देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक २० डिसेंबरला होणार असून ११ पालिकांचे एकत्रित निकाल २१ डिसेंबरला जाहीर होतील.
२०१4 च्या निवडणुकीत काँग्रेसकडे जिल्ह्यातील एक-तृतीयांश जागा, तर भाजपकडे ८४ जागा होत्या. म्हणूनच यंदाच्या निवडणुकीत ‘काँग्रेस विरुद्ध भाजप’ हा पारंपरिक संघर्ष नेमका कोणाच्या बाजूने झुकतो, हे या निकालातून स्पष्ट होणार आहे. आघाड्यांचे गणित, स्थानिक पातळीवरील नाराजी, बंडखोरी आणि स्वतंत्र राजकारणामुळे सध्या जिल्ह्याची राजकीय घडी विस्कटलेली दिसते. या घडीला पुढे कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
F-class land converted into private : एफ-क्लास जमीन ‘खाजगी’ करण्यात आली?
महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल, असे चित्र होते. मात्र प्रत्यक्षात भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी बर्याच ठिकाणी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्याने इतर पक्षांचे गणितच बिघडले. राष्ट्रवादीचे दोन्ही गट, तसेच शिवसेनेचे गट उमेदवार शोधण्यात गोंधळले आणि स्थानिक आघाड्यांवर अवलंबून राहावे लागले.
बुलढाणा शहरातील प्रचारात तीनही पक्षांच्या नेत्यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे वातावरण तापले. मतदानाच्या दिवशी झालेला अभूतपूर्व गोंधळ हा शहराच्या इतिहासातील पहिला अनुभव. शिंदेसेना–भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष अधिक तीव्र झाल्याने ही निवडणूक तिन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.








