शिंदेसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरस; २ नोव्हेंबरला निवड प्रक्रिया, राजकीय समीकरणांकडे लक्ष
Yavatmal : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने वर्चस्व मिळवल्यानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीवरून युतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप या तिन्ही पक्षांकडून अध्यक्षपदासाठी दावा केला जात असल्याने सत्तावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर बँकेच्या सत्तेचे सूत्र निश्चित होईल, अशी अपेक्षा असताना अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणली. मात्र, आता विजयातील वाटा आणि महत्त्वाच्या पदांवरील दावेदारी यामुळे युतीतील घटक पक्षांची कसोटी लागणार आहे. अध्यक्षपदासाठी तिन्ही पक्ष आग्रही असल्याची चर्चा असून, या संदर्भात स्थानिक नेते आणि राज्यस्तरीय नेतृत्वामध्ये अद्याप संयुक्त बैठक झालेली नसल्याने तिढा कायम आहे.
बँकेच्या संचालक मंडळातील पक्षीय संख्याबळानुसार शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी सहा जागा, तर भाजपकडे तीन जागा असल्याचे सांगितले जात आहे. यवतमाळच्या जागेवर शिंदेसेना आणि भाजपचा संयुक्त उमेदवार असल्याने सत्तेच्या गणितात या जागेचेही महत्त्व वाढले आहे. त्यामुळे केवळ पक्षनिहाय संख्याबळावरून अध्यक्षपदाचा निर्णय होईलच, असे नाही.
‘पोट्टेहो’चे मास्तर राजकीय वळणावर! नितेश कराळेंपुढे आता कोणते पर्याय?
शिंदेसेनेकडून निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे अध्यक्षपदासाठी दावेदारी केली जात असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही सहा संचालकांच्या बळावर आपला दावा कायम ठेवल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, भाजपची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. अशा परिस्थितीत तिन्ही पक्षांमध्ये सहमती घडवून आणण्याचे आव्हान महायुतीच्या नेतृत्वासमोर असेल.
जिल्हा बँकेच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता संचालक मंडळाची सभा होणार आहे. दुपारी १२.३० ते १ या वेळेत नामनिर्देशनपत्रांचे वाटप व स्वीकृती, १ ते १.३० या वेळेत छाननी आणि १.३० ते २ या वेळेत माघारीची प्रक्रिया पार पडणार आहे. दुपारी २.३० वाजता अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २.३० ते ३ या वेळेत मतदान, तर दुपारी ३ वाजता मतमोजणी होणार आहे. ही प्रक्रिया अध्यासी अधिकारी अर्चना माळवे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
शेतकरी, महिला, विद्यार्थी, कंत्राटदार सरकारी धोरणांमुळे अडचणीत : हनुमंत पवार
अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या वाटपाबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अद्याप एकमत झालेले नसल्याने उत्सुकता वाढली आहे. कोणत्या पक्षाला अध्यक्षपद मिळणार, उपाध्यक्षपदाची विभागणी कशी होणार आणि संचालक मंडळात सत्तेचा समतोल कसा राखला जाणार, हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सहकार क्षेत्रातील प्रभावाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या पदावर कोणाची निवड होते, यावर महायुतीतील अंतर्गत समन्वयाचे चित्रही स्पष्ट होणार आहे. निवडणुकीतील विजयाचे रूपांतर पदवाटपातील सहमतीत करण्यात महायुतीला यश येते की अध्यक्षपदाच्या दावेदारीवरून मतभेद कायम राहतात, याकडे आता यवतमाळच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
____








