व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Mahayuti Tussle : तटकरेंनी किती ‘सरोगसी बाळांना’ जन्म दिला आणि नंतर…

Mahayuti Tussle : तटकरेंनी किती ‘सरोगसी बाळांना’ जन्म दिला आणि नंतर…

raigad-mahayuti-tussle-mahendra-dalvi-thorve-sunil-tatkare :महायुतीचा संघर्ष चव्हाट्यावर महेंद्र दळवी-थोरवेंचा घणाघाती हल्ला !

Mumbai: रायगड जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा उफाळून आले असून शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोकण विधानपरिषद निवडणुकीपासून कर्जतमधील विकासकामांच्या श्रेयवादापर्यंत विविध मुद्द्यांवरून महायुतीतील संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या मुद्द्यावरून महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे आणि त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्यावर निशाणा साधला. भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे यांच्या भूमिकेमुळे विधानपरिषद निवडणुकीत ‘सरोगसी बाळ’ जन्माला आल्याची उपरोधिक टीका दळवी यांनी केली. तटकरेंनी अशा किती ‘सरोगसी बाळांना’ जन्म दिला आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोकणातील विधानपरिषदेची जागा शिवसेनेने लढवणे आवश्यक होते, अशी भूमिका दळवी यांनी मांडली. शिवसेनेने ही निवडणूक लढवली असती तर पक्षाचा आणखी एक आमदार वाढला असता, असा दावा त्यांनी केला. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश पाळल्यामुळे निवडणुकीतून माघार घेतल्याचे ते म्हणाले. या माघारीमुळे सुनील तटकरे यांची निवडणुकीतील लढाई सोपी झाली, असा आरोपही त्यांनी केला.

Santosh Pandit arrest :यू-ट्यूबर संतोष पंडितांना अटक मध्यरात्री पोलिसांची कारवाई

यावेळी दळवींनी तटकरेंच्या घराणेशाहीवरही टीका केली. स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीऐवजी पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असती तर त्याचे स्वागत केले असते, असे ते म्हणाले. तटकरेंचा ‘सगळे काही आपल्या घरातच हवे’ हा स्वभाव असल्याचा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावरही भाष्य केले. दुसरीकडे, कर्जतमधील रेल्वे पुलांच्या मंजुरीवरून महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना लक्ष्य केले. रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांना सहभागी करून घेतल्यानंतर विकासकामांच्या श्रेयावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.

Manoj Jarange : जरांगे पाटलांचा सरकारला चार दिवसांचा अल्टिमेटम !

पालकमंत्री भरत गोगावले यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना थोरवे यांनी तटकरेंना थेट इशारा दिला. “गोगावले साहेब, आता तटकरेंना आवरा, अन्यथा आम्ही आणि महेंद्र दळवी पुन्हा पेटून उठू,” असा इशारा त्यांनी दिला. कर्जतमध्ये राष्ट्रवादीकडून चुकीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना हे खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रायगडमध्ये महायुतीतील दोन घटक पक्षांमधील हा वाद आता सार्वजनिक व्यासपीठावर पोहोचल्याने आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. विकासकामांचे श्रेय, स्थानिक राजकारण आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तटकरे विरुद्ध शिवसेना आमदारांचा संघर्ष आणखी तीव्र होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!