The journey of the humorous poetry show Mirza Express has been halted : विनोदी काव्यसादरीकरनाच्या ‘मिर्झा एक्सप्रेस’चा प्रवास थांबला
Amravati : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट आणि विनोदी काव्यसादरीकरणाला नवे परिमाण देणारे ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज शुक्रवारी सकाळी 6.30 वाजता अमरावती येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते आणि अमरावती येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात, कवीमंडळात आणि विशेषत: विनोदी साहित्याच्या क्षेत्रात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. हसत-हसत विचार करायला लावणाऱ्या त्यांच्या शैलीने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आणि तीच शैली आज कायमची काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त होते.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज–माणिकवाडा हे मिर्झा यांचे मूळ गाव. सध्या ते अमरावतीतील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘मिर्झा एक्सप्रेस’ अशा नावाच्या घरात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, तसेच कन्या महाजबी आणि हुमा असा परिवार आहे. त्यांच्यावर अमरावती येथील ईदगाह कब्रस्तानात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची आहेत.
Chandrashekhar Bawankule : जेवढे नगरसेवक निवडून येतील, त्यांची मते प्रवीण पोटे यांच्यासाठी
विदर्भ आणि मराठवाड्यातील कविसंमेलनांचे आकर्षणबिंदू ठरलेल्या डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी विनोदी कवितेला एक नवा चेहरा दिला. त्यांची ‘मिर्झा एक्सप्रेस’ काव्यमैफल महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली आणि हास्याचे तुफान माजवणारी ही मैफल मराठी साहित्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली जाईल, असा सर्वांचा विश्वास आहे. त्यांनी 6 हजारांहून अधिक काव्यसादरीकरणे करत रसिकांना पोट धरून हसायला लावले. त्यांच्या नावावर तब्बल 20 काव्यसंग्रह आहेत. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिले होते. त्यांच्या सादरीकरणातील खुमासदार बोली, ग्रामीण कथानकातील टोलकेबाज हशा, सामाजिक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करणारी शैली आणि प्रेक्षकांना जोडून ठेवणारी तुफानी ऊर्जा या वैशिष्ट्यांमुळे ते सभागृहात नेहमीच ‘स्टार परफॉर्मर’ मानले जात.
Local Body Elections : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका एप्रिलमध्ये?
मिर्झा यांचा जन्म 17 सप्टेंबर 1957 रोजी झाला. केवळ 11व्या वर्षी त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली तर 1970 साली त्यांनी मंचावर पहिल्यांदा काव्यसादरीकरण केले. पुढील अर्धशतकभर त्यांनी मंच, मायक्रोफोन आणि लोकांच्या टाळ्यांना मित्र मानत हास्यमय साहित्याचा प्रवास अविरत सुरू ठेवला. ग्रामीण भागातील जीवनशैली, शेती, माती, पारंपारिक संस्कृती, शेतकऱ्यांचे प्रश्न, राजकीय विसंगती यावर त्यांनी हलक्या-फुलक्या पण अचूक आणि धारदार विनोदी शैलीत मत मांडले. मराठी आणि वन्हाडी भाषेबद्दल असलेल्या त्यांच्या प्रेमामुळे वन्हाडी बोली देशभर पोहोचली. अनेकांनी ती प्रथमच मिर्झांच्या कार्यक्रमांमुळे ऐकली. ‘मोठा माणूस’, ‘सातवा महिना’, ‘उठ आता गणपत’, ‘जांगडबुत्ता’ यांसारख्या कविता रसिकांच्या मनात आजही जिवंत आहेत. विशेष म्हणजे ‘जांगडबुत्ता’ हा शब्द मराठी साहित्यविश्वात लोकप्रिय करण्याचे श्रेय मिर्झा यांनाच जाते.
त्यांनी आयुष्यभर हास्य दिले, पण त्या हास्यामागे संवेदना आणि वास्तवाची दृष्टी कायम ठेवली. समाजातील विसंगतींवर विनोदी भाष्य करत विचारांची ठिणगी पेरणे—हे त्यांचे साहित्याचे वैशिष्ट्य होते. म्हणूनच त्यांचे निधन ही केवळ एका कवीची हानी नसून मराठी विनोदी काव्यविश्वातील एका युगाचा अंत आहे. मंचावरील त्यांची तोफ आता कायमची शांत झाली असली तरी त्यांच्या कविता, त्यांची शैली, त्यांचे ठसकेदार सादरीकरणाने दिलेला अमूल्य वारसा रसिकांच्या मनात सदैव जिवंत राहील. मराठी साहित्यविश्व आज एका तेजस्वी, हसऱ्या आणि उदात्त व्यक्तिमत्वाला सलाम करून डोळ्यांत अश्रू घेऊन निरोप देत आहे.
____







