credit war in khamgao for gas connection: जिल्ह्यातील १६ हजार १७७ नागरिकांना नवीन कनेक्शन
Khamgao जिल्ह्यातील तब्बल १६ हजार १७७ नागरिकांना नवीन गॅस कनेक्शन मिळाल्यानंतर खामगावच्या राजकीय वर्तुळात ‘क्रेडिट’ची लढाई चांगलीच रंगली आहे. या योजनेच्या यशाचे श्रेय नेमके कोणाला मिळणार, यावरून पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध गटांकडून आपापल्या दाव्यांची मांडणी सुरू झाली आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी गणेश चौकशे यांच्या समर्थकांकडून या यशाचे श्रेय ‘भाऊं’कडे वळवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यांच्या मते, चौकशे यांनी सातत्याने पाठपुरावा करत हा मुद्दा शासनाच्या पातळीवर नेला. निवेदन, पाठपुरावा आणि स्थानिक स्तरावरचा दबाव यामुळेच ही प्रक्रिया गतीमान झाली आणि हजारो नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळाला, असा त्यांचा ठाम दावा आहे.
मात्र, दुसरीकडे सत्ताधारी गट यावर वेगळीच भूमिका मांडताना दिसत आहे. त्यांच्या मते, गॅस कनेक्शन वाटपाची प्रक्रिया ही आधीपासूनच सुरू होती आणि शासनाच्या धोरणानुसारच ती पूर्ण झाली. चौकशे यांच्या निवेदनाला ते केवळ ‘औपचारिक रिमाइंडर’ मानत असून, त्याचा प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेवर फारसा परिणाम झालेला नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे.
या विरोधी दाव्यांमुळे खामगावच्या राजकारणात उपरोधिक चर्चा रंगू लागल्या आहेत. “गॅस आधीच सिलिंडरमध्ये भरलेला होता; फक्त नॉब कोण फिरवणार, यावरूनच खरी स्पर्धा होती,” अशी तुलना सध्या राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे. यावरूनच या मुद्द्याला केवळ विकासकामाचा विषय न मानता, आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्व प्राप्त झाले असल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान, या प्रकरणात ‘फोटो पॉलिटिक्स’चाही रंग चढताना दिसत आहे. विविध गटांकडून कार्यक्रमांचे फोटो, निवेदनांचे पुरावे आणि भेटींचे क्षण सोशल मीडियावर पुढे करत आपापल्या भूमिकेला बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गॅस कनेक्शनच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी या यशाचे श्रेय कोणाला मिळणार यावरून खामगावात राजकीय तापमान वाढले आहे. आगामी काळात ही ‘क्रेडिट वॉर’ आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








